काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू
By Admin | Updated: December 13, 2014 02:14 IST2014-12-13T02:14:07+5:302014-12-13T02:14:48+5:30
काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू

काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक : वडाळा नाका चौफुलीवर भरधाव ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून सिडकोच्या साईबाबानगर काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली़ शशिकांत नामदेव सोनार व निखिल मुकेश सोनार ही अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी ट्रकचालक अकिल शेख उस्मान यास ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, वडाळा नाका चौफुलीवरील अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हा बँकेच्या सर्व्हिसरोडने शशिकांत सोनार हे त्यांचा पुतण्या निखिलसह दुचाकीवरून (एमएच १५ एएन ७३७१) मुंबई नाक्याच्या दिशेने जात होते, तर द्वारकाकडून मुंबई नाक्याच्या दिशेने महामार्गावरून ट्रक (एमएच १५ सीके ४६५२) जात होता़ वडाळा नाका चौफुलीवर येताच ट्रकचालकाने अचानक ट्रक नागजी रुग्णालयाच्या दिशेने जाण्यासाठी वळविला़ यामुळे सोनार यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते दोघही ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले़ हा अपघात इतका भयंकर होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला़
या अपघातानंतर परिसरातील नागरिक व भद्रकाली पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली़