तडीपारांच्या वास्तव्यामुळे शहरात अस्वस्थता
By Admin | Updated: January 10, 2016 23:59 IST2016-01-10T23:57:46+5:302016-01-10T23:59:20+5:30
मुक्त संचार : विशेष शाखा, गुन्हे शोध पथक व कोम्बिंग आॅपरेशनबाबत प्रश्नचिन्ह

तडीपारांच्या वास्तव्यामुळे शहरात अस्वस्थता
नाशिक : पोलीस ठाण्यांतील विविध गंभीर गुन्ह्यांत पोलीसदफ्तरी फरार असलेल्या, तसेच शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांचा शहरातच मुक्त संचार असल्याचे सराईत गुन्हेगार अर्जुन आव्हाड व निखिल गवळे यांच्या खुनावरून समोर आले आहे़ शहरातच असलेल्या या तडीपारांची खबर पोलिसांना मिळत नसल्याने खबऱ्यांचे नेटवर्क, पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पोलीस आयुक्तालयात राबविण्यात येणाऱ्या कोम्बिंग आॅपरेशनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सातपूरच्या विश्वासनगरमधील अॅडव्होकेट मेधा जगताप यांचा २१ फेब्रुवारी २०१३ रोजी धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली होती़ या खूनप्रकरणी अर्जुन महेश आव्हाड ऊर्फ वाट्या, चेतन अंबादास सावकार व जितेंद्र राजेंद्र कुलथे यांच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे़ पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आव्हाड यास ६ मार्च २०१४ ला तर सावकार व कुलथे या दोघांना ७ एप्रिल २०१४ मध्ये तडीपार केले होते; मात्र यानंतरही हे तिघे सातपूर परिसरात राहात होते़
आरोपींचा मालमत्ता तसेच शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने सहभाग आढळल्यास त्यांना पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये तडीपार करण्यात येते़ परिमंडळ दोनमध्ये करण्यात आलेल्या ३३ तडीपारांमध्ये अर्जुन आव्हाडचाही समावेश होता़ तर निखिल गवळे शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरार होता़ ३१ डिसेंबरपासून हे दोघेही बेपत्ता असूनही त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार केली नाही़ याचे कारण म्हणजे ते तडीपार असले तरी राजरोसपणे फिरत होते़
नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना अहमदनगर, धुळे, ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत नेऊन सोडले जाते़ मात्र पोलिसांची नजर चुकवून वा अन्य मार्गांनी ते शहरात दाखल होऊन अवघ्या काही तासांत गुन्हा करून जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या भागात पलायनही करतात़ या तडीपारांना शहरापासून रोखण्यासाठी प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे़ त्यातच शहरात परिमंडळ दोन, परिमंडळ एकमध्ये कोम्बिंग आॅपरेशन राबविले जाते़ मात्र त्यामध्ये अपवादानेच एखादा तडीपार आढळून येतो़ नाशिक शहरात प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर विशेष शाखा आहे़ पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या घडामोडी, गुन्हेगांर यांच्याबाबत गुप्त माहिती मिळवून ती पोलीस आयुक्तालयास देण्याचे काम त्यांच्याकडे असते़ तसेच गुन्हे शोध पथक, गुन्हे शाखेचे तीन युनिटही शहरात कार्यरत आहेत़ पोलिसांची इतकी मोठी यंत्रणा असतानाही तडीपार राजरोसपणे फिरतात, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ (प्रतिनिधी)