पालिकेच्या भूखंडावरच अनधिकृत झोपडपट्टी
By Admin | Updated: May 23, 2016 22:31 IST2016-05-23T22:20:37+5:302016-05-23T22:31:33+5:30
अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष : दिंडोरीरोडवरील निसर्गनगर येथील प्रकार

पालिकेच्या भूखंडावरच अनधिकृत झोपडपट्टी
पंचवटी : दिंडोरीरोडवरील निसर्गनगर परिसरात महापालिकेच्या मालकीचा आरक्षित भूखंड असून, या भूखंडावरच काही नागरिकांनी अनधिकृतपणे झोपडपट्टी थाटून मनपा प्रशासनाला आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून या झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण केले आहे, याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.
निसर्गनगर परिसरात नागरी वसाहत झपाट्याने वाढलेली आहे. तेथील नागरिकांनी पिण्याचे पाणी, पथदीप तसेच रस्ते या समस्यांना तोंड द्यावे लागत असतानाच आता परिसरातील महापालिकेच्या भूखंडावर अनधिकृतपणे थाटलेल्या झोपडपट्टीचा त्रास सहन करावा लागत आहे. या झोपडपट्टीत राहणारे नागरिक परिसरातच बकऱ्या चरण्यासाठी मोकळ्या सोडत असल्याने त्यांचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या परिसरात आठ ते दहा झोपड्या असून आगामी कालावधीत मनपाच्या अतिक्रमण विभागाने लक्ष केंद्रित केले नाही तर झोपडपट्टी वाढून नागरिकांना आणखीच त्रास सहन करावा लागण्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)