अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम थंडावली
By Admin | Updated: August 26, 2016 22:34 IST2016-08-26T22:34:02+5:302016-08-26T22:34:27+5:30
अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम थंडावली

अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम थंडावली
इंदिरानगर : प्रभाग ५४ मधील पांडवनगरी परिसरातील अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम आणि कारवाई पाणीपुरवठा विभागाने अर्धवटच सोडून दिली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागासंबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षाबद्दल आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनीही केली आहे.
गेल्या दहा वर्षांत विकसित झालेल्या पांडवनगरी परिसरात सहकारी कर्मचाऱ्यांनी विशेष सवलतीत गृहनिर्माण संस्था उभ्या केलेल्या आहेत. परिसरात सुमारे ४०० सदनिका असून, ७० टक्के सदनिकांमध्ये भाडेकरूंचे वास्तव्य आहे. एकवेळ पाणीपुरवठ्यामुळे अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या टाकीत पाणी साठविले जाते. तेथून वरच्या टाकीत विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचले जाते. परंतु अनेक ठिकाणी अनधिकृतपणे नळजोडण्या घेण्यात आल्या असून, त्यामुळे लाखो लिटर्स पाण्याची
चोरी होत आहे. सदर नळजोडण्यांची कोणतीही बिले जात नसल्याने
मनपाचा कर बूडत आहे.
पूर्व विभागाच्या वतीने अनधिकृत ५० नळजोडण्या तोडण्यात आल्या होत्या. तसेच पाच विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या, परंतु नागरिकांनी विरोध केल्याने मोहीम थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. अद्यापपर्यंत अनधिकृत नळजोडणी न तोडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे थातूरमातूर अनधिकृत नळजोडणींवर कारवाई करून पाणीपुरवठा विभागाने काय साध्य केले आहे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.