जिल्ह्यातील नगराध्यक्षांची बिनविरोध निवड

By Admin | Updated: July 20, 2014 01:49 IST2014-07-19T21:25:22+5:302014-07-20T01:49:19+5:30

येवला, नांदगाव, सटाण्यात राष्ट्रवादी सत्तेत; सिन्नरला कॉँग्रेस, मनमाड येथे आघाडी सत्तेत, शिवसेनेचा बहिष्कार

The unanimous selection of the city's chief of the district | जिल्ह्यातील नगराध्यक्षांची बिनविरोध निवड

जिल्ह्यातील नगराध्यक्षांची बिनविरोध निवड



नाशिक : जिल्ह्यातील नगरपालिकांच्या सर्वच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली. येवला, नांदगाव, सटाणा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस, सिन्नर येथे कॉँग्रेस, तर मनमाड येथे आघाडीच्या उमेदवाराची नगराध्यक्षपदी वर्णी लागली.
येवला नगराध्यक्षपदी शेख शबानाबानो व उपनगराध्यक्षपदी पंकज पारख, सटाणा नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलोचना चव्हाण व उपनगराध्यक्षपदी ज्योती सोनवणे, मनमाड येथे आघाडीचे योगेश पाटील नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी ललिता अहिरे, सिन्नर येथे नगराध्यक्षपदी आश्विनी देशमुख, तर उपनगराध्यक्षपदी नामदेव लोंढे, नांदगावी नगराध्यक्षपदी रामनिवास कलंत्री व उपनगराध्यक्षपदी इंदूबाई जाधव यांची निवड करण्यात आली आहे. मनमाड येथे पाणीटंचाईचे कारण देत शिवसेनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकला, तर सटाणा येथे उपनगराध्यक्षपद विरोधकांपैकी कुणालाही न दिल्यामुळे इतर पक्षांनी उपाध्यक्ष निवडीवर बहिष्कार टाकला. अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली.
राज्यभरातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला असल्यामुळे शहरांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. नूतन नगराध्यक्षांसमोर हा संप त्वरित मिटविण्याचे मोठे आव्हान आहे.
अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून, पाणीप्रश्न सोडविण्यासाठीही नूतन नगराध्यक्षांना कसरत करावी लागणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करू, असे मत नूतन पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर व्यक्त केले.
दरम्यान, सिन्नर, नांदगाव येथे विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. (लोकमत चमू)

सटाण्यात महिलाराज
सटाणा : नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या सुलोचना कांतीलाल चव्हाण, तर उपनगराध्यक्षपदी ज्योती रत्नाकर सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बागलाणचे उपविभागीय प्रांत संजय बागडे होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसने उपनगराध्यक्षपद भाजपा, शिवसेना, अपक्ष किंवा भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस यापैकी कुणालाही न दिल्याने त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. यामुळे आगामी काळात पालिकेतील राजकारणाची दिशा बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नगर परिषद सभागृहात दुपारी १२ वा. निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला. नगराध्यक्षपदासाठी सुलोचना चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठीदेखील राष्ट्रवादीच्या ज्योती सोनवणे यांचा एकच अर्ज दाखल झाला असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.चव्हाण उपनगराध्यक्ष सौ. सोनवणे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

मनमाडला सेनेचा बहिष्कार
मनमाड नगरपालिकेच्या अध्यक्षपदी आघाडीचे योगेश दिलीप पाटील यांची, तर उपनगराध्यक्षपदी ललिता अहिरे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी भीमराव शिंदे, मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी राजेंद्र पगारे, राजेंद्र अहिरे, बब्बू कुरेशी, बाळासाहेब पाटील, धनंजय कमोदकर, सचिन दराडे, नूतन पगारे, योगिता शिरसाठ, सबिहा सोनावाला, सविता गिडगे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी योगेश पाटील व ललिता अहिरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. शहरातील तीव्र पाणीटंचाईमध्ये घेण्यात येत असलेल्या या निवडणुकीवर शिवसेनेकडून बहिष्कार टाकल्याने शिवसेना नगरसेवकांनी निवडणूक प्रकियेत सहभाग घेतला नाही. बिनविरोध निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.






या वेळी मविप्र चे तालुका संचालक दिलीप पाटील, कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अफजल शेख, सतिष शर्मा,कैलास पाटील, सुभाष नहार यांच्या सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उप्स्थित होते.



येवल्यात विशेष सभा
येवला नगराध्यक्षपदासाठी शेख शबानाबानो व उपनगराध्यक्षपदासाठी पंकज पारख यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांनी घोषित केले. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी केली. अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावर नगरसेविका उषाताई शिंदे व राजश्री पहिलवान यांची सुचक म्हणून स्वाक्षरी आहे. उपनगराध्यक्षपदी पंकज पारख यांच्या उमेदवारी अर्जावर नगरसेविका सरला निकम व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते नगरसेवक प्रदीप सोनवणे यांची सूचक म्हणून तर मावळते नगराध्यक्ष नीलेश पटेल यांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, प्रदीप सोनवणे, बंडू क्षीरसागर, उषाताई शिंदे, नीलेश पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष निवडीनंतर तातडीची सभा घेण्यात आली शहरातील अस्वच्छता, पाणी परिस्थितीबाबत यावर चर्चा करण्यात आली. नगरपालिका कर्मचा-यांच्या संपाबाबत शासनाने तातडीने तोडगा काढावा, असा ठरावही करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचे ठरले.

सिन्नर येथे मिरवणूक
सिन्नर येथे नगराध्यक्षपदी कॉँग्रेसच्या आश्विनी देशमुख, तर उपनगराध्यक्षपदी नामदेव लोंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नूतन पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षपदासाठी आश्विनी देशमुख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्याने देशमुख यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी नामदेव लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. लोंढे यांच्याव्यतिरिक्त कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा केली. बैठकीस विठ्ठल उगले, लता मुंढे, बापू गोजरे, मेहमूद दारुवाला, संजय नवसे, हर्षद देशमुख, डॉ. प्रतिभा गारे, राजश्री कपोते, शीतल कानडी, उज्ज्वला खालकर, सुजाता गाडे, लता हिले, मंगला जाधव आदि नगरसेवक उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


नांदगाव येथे जल्लोष
नांदगाव : नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामनिवास (बाळकाका) कलंत्री यांची, तर उानगराध्यक्षपदी नगरसेविका श्रीमती इंदूबाई जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा उपविभागीय अधिकारी संदीप पाटील केली.
नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या दिवशी रामनिवास कलंत्री यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आला होता. आज त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली, आमदार पंकज भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात आज झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका इंदूबाई जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब कवडे, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, राजेश कवडे, नीलदादा सोनवणे आदिंंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मालेगाव येथील उपविभागीय प्रांत अधिकारी संदीप पाटील, गायधनी, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर आदिंंनी काम पाहिले. निवडीची घोषणा होताच समर्थकांनी नगर परिषद कार्यालयासमोर फटाके वाजवून ढोलताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला.

Web Title: The unanimous selection of the city's chief of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.