ग्रामपंचायत दप्तर तपासणीवर झाले एकमत
By Admin | Updated: November 6, 2015 22:54 IST2015-11-06T22:24:10+5:302015-11-06T22:54:06+5:30
सिन्नर : पंचायत समितीच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये एकीचे दर्शन

ग्रामपंचायत दप्तर तपासणीवर झाले एकमत
सिन्नर : ग्रामसेवक गावागावांत गट-तट निर्माण करीत आहेत. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणे लावून देतात आणि आपली पोळी भाजून घेत असल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत माजी सभापती बाळासाहेब वाघ यांच्यासह पंचायत समिती सदस्यांनी केला. गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत विभागाने ग्रामसेवकांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी गटनेते उदय सांगळे यांनी केली. ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकवेळ तरी ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी करावी यावर पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली.
पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीस व्यासपीठावर उपसभापती राजेंद्र घुमरे, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, गटनेते उदय सांगळे, सदस्य रामदास खुळे, वसंत उघडे, अलका मुरडनर, छाया दळवी, सोनल कर्डक, अलका पवार आदि मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक बैठकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडून एकमेकांचे उणे-दुणे काढणाऱ्या पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र या बैठकीत एकजुटीचे प्रदर्शन दिसून आले. ग्रामपंचायत विभागाचा आढावा घेताना सर्वच सदस्य अक्षरश: ग्रामसेवकांच्या कारभारावर तुटून पडल्याचे बैठकीत दिसून आले. जवळपास प्रत्येक सदस्याने ग्रामसेवकांमुळे गावांचा विकास खुंटल्याचा आरोप केला. ग्रामसेवक गावातच दिसत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सांगळे व वाघ यांनी केली. विस्तार अधिकाऱ्यांनी किती ग्रामपंचायतींना भेटी देऊन दप्तर तपासणी केली, असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही आणि घरभाडे घेत असल्याचा गंभीर आरोप वाघ यांनी केला. त्यांचे घरभाडे वसूल करण्याचा प्रस्ताव वाघ यांनी मांडला.
जलयुक्त शिवार अभियानातून गावांची निवड करताना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. यापुढे गावांची निवड करताना पंचायत समिती स्तरावर विचारणा केली जावी, अशी मागणी सांगळे यांनी केली. यावेळी कृषी विभागाला चांगलेच धारेवर धरण्यात आले. विविध
लाभार्थींना कधी व किती वस्तूंचे वाटप झाले याची माहितीही कृषी विभाग देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. लोकप्रतिनिधींना न विचारता कृषी विभाग राबवित असलेल्या कामांबाबत यावेळी नाराजी व्यक्त करतानाच, योजना राबविताना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याची मागणी करण्यात आली.
लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सिन्नरबाबतीत पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप सांगळे यांनी केला. अनेक योजना नादुरुस्त झाल्यानंतर कामे करण्यास ते उदासीनता दाखवित असल्याचे सांगळे म्हणाले. योजना बंद पडल्यानंतर ते गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे सांगळे यांनी सांगितले. त्यांच्या कामाविरोधात ठराव करुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी सांगळे यांनी केली.
बैठकीत बांधकाम, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत विभाग, रोजगार हमी योजना आदिंसह विविध खात्यांचा आढावा घेण्यात आला. पशुसंवर्धनचे खातेप्रमख बैठकीस गैरहजर होते. (वार्ताहर)
वाजे-कोकाटे समर्थकांचे सूर जुळले...
राजकारणात विळ्या-भोपळ्याचे नाते असलेल्या आमदार राजाभाऊ वाजे व माजी आमदार माणिकराव कोकाटे समर्थक पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सूर जुळल्याचे बैठकीत दिसून आले. प्रत्येक बैठकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे कोकाटे समर्थक माजी सभापती बाळासाहेब वाघ व वाजे समर्थक गटनेते उदय सांगळे यांनी बैठकीत युती केल्याचे दिसून आले. वाघ-सांगळे जोडीने आढावा बैठकीत सर्वच खातेप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले. अपूर्ण कामांबाबत व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर कामे केली जात असल्याबाबत त्यांनी खातेप्रमुखांना जाब विचारला. एकमेकांवर तुटून पडणारे वाजे-कोकाटे समर्थक यावेळी एकीने अधिकाऱ्यांवर तुटून पडल्याचे दिसून आले. विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपसातील मतभेद बाजूला ठेवले पाहिजे तरच अधिकाऱ्यांपुढे आपला टिकाव लागेल हे उभय पदाधिकाऱ्यांच्या उशिरा का होईना लक्षात आल्याने गेल्या चार वर्षांच्या इतिहासात पहिलीच बैठक पदाधिकाऱ्यांच्या आपसातील आरोप-प्रत्यारोपांशिवाय पार पडली.