उमटली कृष्णेंद्राची स्वरनक्षी
By Admin | Updated: November 14, 2015 22:21 IST2015-11-14T22:04:38+5:302015-11-14T22:21:12+5:30
पिंपळपार : ‘संस्कृती नाशिक’च्या सुरेल मैफलीला दर्दींची हजेरी

उमटली कृष्णेंद्राची स्वरनक्षी
नाशिक : दिवाळी पाडव्याला नेहरू चौकातील पिंपळपार सलग १६व्या वर्षी एका अभिजात शास्त्रीय संगीत मैफलीचा साक्षीदार होण्यास सज्ज झाला आणि ख्याल गायकीतून हुबळीच्या कृष्णेंद्राच्या अलवार स्वरांची नक्षी जाळीदार पिंपळपानावर उमटली. ‘संस्कृती नाशिक’ या संस्थेच्या या मैफलीला दर्दी नाशिककरांची प्रतिवर्षीप्रमाणे भरभरून उपस्थिती लाभली.
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांच्या ‘संस्कृती नाशिक’ या संस्थेच्या वतीने यंदा कर्नाटकातील किराणा घराण्याचे गायक व पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य कृष्णेंद्र वाडीकर यांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या या मैफलीची सुरुवात कृष्णेंद्र यांनी राग भटियारने केली. एकतालात विलंबित ख्याल आणि तीनतालात छोटा ख्याल सादर करत कृष्णेंद्र यांची मैफल पुढे सरकली. सोबतच झपतालात जौनपुरी राग सादर केला. ‘जागो जागो प्यारे मोरे लाल’, ‘गानविद्या बडी कठीण, गुरुचरणी शिष्यधारी’, ‘पायल बाजन लागी रे’ या रचना सादर करत कृष्णेंद्र यांनी मैफलीत रंग भरले. त्यानंतर त्यांनी ‘पिया मिलन की आस’ ही ठुमरी सादर केली. ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्या’ या रचनेला रसिकांनी भरभरून दाद दिली तर झपतालात ‘दत्तगुरु दत्तगुरु सुमीरण’ हा अभंग सादर करत पाडव्याचा आनंद द्विगुणीत केला. शेवटी ‘देह जाओ अथवा राहो’ आणि ‘पावलो पंढरी वैकुंठ भुवनी’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली. त्यांना साथसंगत नाशिकचे नितीन वारे (तबला), उमेश पुरोहित (संवादिनी), दिगंबर सोनवणे (पखवाज), अमित भालेराव (तालवाद्य), रोहित गावडे व विनोद कुलकर्णी (तानपुरा) यांनी केली. सदर मैफल स्व. भास्करराव भातंबरेकर यांना समर्पित करण्यात आली.
प्रारंभी, वेदमंत्रोच्चारात महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, ‘लोकमत’चे दिल्ली येथील राजकीय संपादक सुरेश भटेवरा, जयंत भातंबरेकर, विवेक पाटणकर, अॅड. अशोक जाधव, राजेंद्र राजोळे, पुंडलिक वारे, नाट्यपरिषदेचे नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. (प्रतिनिधी)