नेट परीक्षा केंद्राबाबत यूजीसी सरचिटणीसच अनभिज्ञ

By Admin | Updated: July 6, 2014 00:09 IST2014-07-06T00:04:08+5:302014-07-06T00:09:16+5:30

नेट परीक्षा केंद्राबाबत यूजीसी सरचिटणीसच अनभिज्ञ

UGC general secretary ignorance about NET examination center | नेट परीक्षा केंद्राबाबत यूजीसी सरचिटणीसच अनभिज्ञ

नेट परीक्षा केंद्राबाबत यूजीसी सरचिटणीसच अनभिज्ञ

 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात नावलौकिकप्राप्त अशा शैक्षणिक संस्था असताना प्राध्यापकाच्या पात्रता परीक्षेसाठी हजारो परीक्षार्थींना लगतच्या जिल्ह्यांमध्ये जावे लागते आणि नाशिक दौऱ्यावर आलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सरचिटणीसच याबाबत अनभिज्ञ होत्या. विशेषत: जिल्ह्यातून हजारो परीक्षार्थी नेट परीक्षा देत असल्याचे कळताच त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि नाशिकला नेट-सेटचे केंद्र असायला हवे असे म्हणत याबाबत स्वत: लक्ष घालणार असल्याचे सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सरचिटणीस रेणू बत्रा यांनी आज नाशिकच्या दौऱ्यादरम्यान शैक्षणिक सोयीसुविधांची पाहणी करून प्राचार्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करताना, नाशिकला नेट-सेटचे परीक्षा केंद्र नसल्याने हजारो विद्यार्थ्यांना त्यासाठी लगतच्या दोनशे-तीनशे किलोमीटर अंतरावरील जिल्ह्यात जावे लागत असल्याचे सांगितले. गेल्याच आठवड्यात झालेल्या नेट परीक्षेला जिल्ह्यातून सुमारे आठ हजार विद्यार्थी समाविष्ठ होते. मात्र, त्यांना त्यासाठी पुणे, औरंगाबाद, जळगाव, मुंबई या लगतच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर जावे लागते. परीक्षेच्या एक दिवस आधीच त्या शहरात त्यांना दाखल व्हावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक तर होतेच शिवाय मानसिक त्रासही होतो.
नाशिकला नेट परीक्षेचे केंद्राबाबत अनभिज्ञता व्यक्त करीत सरचिटणीस बत्रा यांनी आठ हजार विद्यार्थी येऊन परीक्षा देत असतील तर केंद्र असायलाच हवे असे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यावेळी पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्राचे समन्वयक श्रीवास्तव यांनीही त्यांच्या मताशी सहमती व्यक्त करीत अनेक संस्थांमध्ये परीक्षेची सोय होणे शक्य असल्याचे सांगितले. यावेळी विद्यापीठाच्या परीक्षा केंद्राचे व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य हरिष आडके यांनीही परीक्षा केंद्र होणे शक्य असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: UGC general secretary ignorance about NET examination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.