Uddhav Thackeray Nashik Nirdhar Shibir: भाजपासारखे थोतांड करायची आवश्यकता नाही. त्यांनी अपप्रचार केला. फेक नरेटिव्ह पसरवला की, शिवसेना ठाकरे गटाने हिंदुत्व सोडले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. मुस्लिम समाज आमच्यासोबत आला. तो का आला? कारण कोरोना काळात मी कधी जातीय भेदभाव केला नाही. मी मुख्यमंत्री असताना, त्या मुख्यमंत्रीपदाची जी शान होती, तिला कधी डाग लागू दिला नाही. सगळ्यांना समानतेने वागवले, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. नाशिक येथे ठाकरे गटाचे निर्धार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी वक्फ बोर्डापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवरून शेलक्या शब्दांत भाजपावर टीकास्त्र सोडले. तुम्ही सांगा मला की, कोणी हिंदुत्व सोडले की, भाजपाने सोडले की मी सोडले? आपण वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला. हिंदुत्वाचा आणि वक्फ सुधारणा कायद्याचा काडीचा संबंध नाही. दोन दिवस संसदेत झालेली भाषणे तुम्ही ऐका. सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही जो काही सत्ता जिहाद केला, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला तुम्ही दूर केले आणि आम्हाला सांगता की, आम्ही हिंदुत्व सोडले, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण
मी काँग्रेसच्या वतीने इथे बोलायला आलो नाही. पण, पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करू दाखवावा. काँग्रेस आणि तुम्ही काय ते बघा. पण मला एक दोन गोष्टी आवडल्या. काँग्रेसचे आत्ताचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, असाच मुद्दा असेल, तर संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा. शर्यत लावा. येत्या वर्षांत संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. काँग्रेसला १२५ ते १५० वर्ष झाली. मग साधा एक आपण हिशोब मांडू या की, संघाचे आत्तापर्यंतचे सगळे सरसंघचालक, त्यात कोण दलित होते, कोण मुस्लिम होते आणि काँग्रेसचे काढा. हे सगळे लोकांसमोर ठेवा. पण लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. अमित शाहजी, छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्रापुरते सीमित ठेवेल, तर असे नाही. छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत.
दरम्यान, ढोंगावर मी लाथ मारलेली आहे. मी भाजपाला सोडलेले आहे, हिंदुत्वाला सोडलेले नाही. मी मेलो तरी हिंदुत्व सोडू शकत नाही. भाजपाचे हिंदुत्व बुरसटलेले आहे आणि भाजपाचे बुरसटलेले हिंदुत्व मला मान्य नाही. यांचे कसले आले हिंदुत्व? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.