पर्यटकांच्या वाहनांमधून चोरीचे प्रकार

By Admin | Updated: February 26, 2017 23:19 IST2017-02-26T23:19:12+5:302017-02-26T23:19:38+5:30

इंदिरानगर : मुंबई-आग्रा महामार्गावरील नेहरू उद्यानात तयार करण्यात आलेल्या बॉटनिकल गार्डनला येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमधून चोरी होत असल्याचे समोर आले आहे.

Types of theft among tourist vehicles | पर्यटकांच्या वाहनांमधून चोरीचे प्रकार

पर्यटकांच्या वाहनांमधून चोरीचे प्रकार

इंदिरानगर : मुंबई-आग्रा महामार्गावरील नेहरू उद्यानात तयार करण्यात आलेल्या बॉटनिकल गार्डनला येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमधून चोरी होत असल्याचे समोर आले आहे. येथे येणाऱ्या अनेक वाहनांमधून मौल्यवान वस्तू चोरण्यात आल्या असल्याने पर्यटकांसाठी गार्डन सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मुंबई महामार्गावरील बॉटनिकल गार्डनचे नाशिककरांसह मुंबईतील नागरिकांनादेखील आकर्षण असल्याने दर शनिवार आणि रविवार पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते. त्याप्रमाणेच इतर दिवशी नाशिकसह परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने बॉटनिकल गार्डनमध्ये येत असतात. त्यामुळे गार्डनबाहेर वाहनांची मोठी रांग लागलेली असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांच्या वाहनांमधून मौल्यवान साहित्यांची चोरी होत असल्याची बाब समोर आली आहे.  चोरटे वाहनाची काच फोडून आतमधील मौल्यवान साहित्य तसेच कार इंटेरिअरच्या वस्तू चोरून नेत असल्याचे प्रकार घडले आहेत. मुख्य पार्कपासून दूरवर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमधूनच चोऱ्या होऊ लागल्याने वाहनतळासाठी अधिकृत पार्किंग करण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.  पांडवलेण्यालगत नेहरू उद्यानात महापालिकेने अद्ययावत असे बॉटनिकल गार्डन तयार केले आहे. त्यामुळे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. बॉटनिकल गार्डनमधील लेझर शो प्रमुख आकर्षण असून, हा शो पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. सुट्टीच्या दिवशी तर महामार्गावर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.  रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटे पर्यटकांच्या वाहनांची काच फोडून कारमधील चीजवस्तूंची चोरी करीत आहेत. गेल्या आठ दहा दिवसांपासून तर चोरट्यांनी एकाच दिवशी आठ ते दहा गाड्या फोडल्याची बाबही समोर आली आहे. याप्रकरणी पर्यटकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्यापही सदर प्रकार सुरूच आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा किंवा पोलीसगस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीचा शेवटचा भाग म्हणजे बॉटनिकल गार्डन आहे. त्यामुळे या भागात पोलिसांची गस्त मोठ्या प्रमाणात नसल्याने गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Types of theft among tourist vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.