बाचाबाचीचे प्रकार : पोलिसांकडून चोख बंदोबस्त
By Admin | Updated: February 22, 2017 01:21 IST2017-02-22T01:20:58+5:302017-02-22T01:21:13+5:30
सिडकोत बोगस मतदार, पैसे वाटपाच्या तक्रारी

बाचाबाचीचे प्रकार : पोलिसांकडून चोख बंदोबस्त
सिडको : जीपमधून बोगस मतदारांची थेट मतदान केंद्रापर्यंत वाहतूक करण्याबरोबरच मतदारांना थेट उमेदवाराच्या घरातून पैशांचे वाटप होत असल्याच्या तक्रारी, मतदान केंद्रावर होणाऱ्या बाचाबाचीच्या घटना वगळता सिडकोत शांततेत मतदान झाले.
कामगार वर्ग असलेल्या सिडकोतील प्रभाग क्रमांक २५, २६, २७, २८, २९ व ३१ अशा सात प्रभागामध्ये मंगळवारी १५७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. एकूण दोन लाख पाच हजार ७१४ मतदारांपैकी सुमारे ६० टक्के मतदारांनी यावेळी आपला हक्क बजावला. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होताच, प्रामुख्याने साऱ्या उमेदवारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आपला हक्क बजावून घेतला त्यामुळे सुरुवातीच्या दोन तासात जेमतेम सात टक्के इतकेच मतदान झाले. त्यानंतर नऊ वाजेनंतर मात्र पुन्हा मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. अनेक मतदारांना मतदान चिठ्ठी न मिळाल्यामुळे त्यांना मतदान केंद्राबाहेर उमेदवारांनी लावलेल्या बूथवरून मतदान चिठ्ठी देण्यात आली, तर काही मतदारांचे नावच सापडत नसल्याने गोंधळ उडाला. अशातच उत्तमनगर येथील जनता विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी एका पिक अप व्हॅनमधून वीस ते पंचवीस मतदार बोगस मतदानासाठी आणल्याचा संशय काही उमेदवारांना आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे पोलिसांनी तातडीने जीपसह चालकास ताब्यात घेतल्यामुळे यासंदर्भातील वाद संपुष्टात आला.
दुपारी बारा वाजेच्या दरम्यान डीजीपीनगर येथे प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजप उमेदवाराच्या घरातून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धी उमेदवाराने घेतला व पोलिसांकडे तक्रार केली असता, पोलिसांनी खात्री करण्यासाठी उमेदवाराच्या घराची झडती घेतली, परंतु त्यात तथ्य आढळून आले नाही. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या जात होत्या. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही उमेदवारांच्या घरासमोर बंदोबस्त तैनात केला.
याचबरोबर उत्तमनगर येथील जनता विद्यालयातील मतदान केंद्राबाहेर उभे राहून भाजप उमेदवार मुकेश शहाणे हे भ्रमणध्वनीवरून लघुसंदेशाद्वारे प्रचार करीत असल्याची तक्रार आल्याने सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी शहाणे यांच्या हातातील भ्रमणध्वनी हिसकावून घेतल्याने काही काळ याठिकाणी तणाव निर्माण झाला, नंतर मात्र परिस्थिती निवळली. असाच प्रकार डीजीपीनगर येथील मयूर हॉस्पिटल येथे घडल्याने पोलिसांची धावपळ उडाली. मतदारांना पैशांचे वाटप केले जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी धाव घेतली.