अवनखेडचा प्रकार : आठ महिन्यांपासून फाईलींचा प्रवास
By Admin | Updated: July 26, 2016 23:46 IST2016-07-26T23:46:25+5:302016-07-26T23:46:25+5:30
आदर्श सांसद ग्रामच्या उपकेंद्रांची नस्ती अडकली ‘नकलेत’

अवनखेडचा प्रकार : आठ महिन्यांपासून फाईलींचा प्रवास
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या दोन कोटी रुपयांच्या वाहन खरेदीला कामापुरता नकलेचा ठराव मिळण्यास अडचण आल्यानंतर आता आदर्श सासंद ग्राम योजनेत दत्तक घेतलेले अवनखेड येथील ९५ लाख रुपयांच्या आरोग्य उपकेंद्रांच्या मंजुरीलाही कामापुरता ‘नकलेच्या’ ठरावाची आडकाठी आल्याचे समजते.
दरम्यान, उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांची याप्रकरणी कान उघडणी करतानाच सर्व साधारण सभेत मंजुरी मिळालेल्या अवनखेड आरोग्य उपकेंद्रांच्या कार्यारंभ आदेशाला आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास आडकाठी काय? अशी विचारणा केली. त्यावर सर्व साधारण सभेत मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात आम्हाला इतिवृत्ताची प्रत अथवा संबंधित आरोग्य उपकेंद्रांच्या कामास मंजुरीबाबत कामापुरता नक्कल मागूनही ती न मिळाल्याचे सांगितले.
आदर्श सांसद ग्राम योजनेत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी तालुक्यातील अवनखेड हे गाव दत्तक घेतले आहे. यागावात अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांच्या इमारतीला गळती लागली असून, आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतीवर पावसाळ्यात प्लास्टिकचे आवदन टाकावे लागत असल्याचे चित्र आहे. जानेवारी महिन्यात येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास प्रशासकीय मान्यता मिळून आणि त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ९५ लाखांचा निधी मंजूर होऊनही आता सात महिन्यांचा कालावधी उलटला तरी या कामाचे कार्यारंभ आदेश निघालेले नसल्याचे अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव यांचे म्हणणे आहे. याप्रकरणाची माहिती मिळाल्यावर उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी या कामांच्या निविदा आणि कार्यारंभ आदेशास काय अडचण आहे? याची विचारणा कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांना केली.
२९ जूनला झालेल्या सर्व साधारण सभेत या उपकेंद्रास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, निविदा व कार्यारंभ आदेश काढण्यास या सभेच्या ठरावाची नक्कल असल्याशिवाय या कामाचे कार्यारंभ आदेश काढता येणार नसल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहन खरेदीला आलेली कामापुरता ठरावाच्या नक्कलचीच अडचण आदर्श सांसद ग्राम असलेल्या अवनखेडच्या उपकेंद्राच्या कामास आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)