दुचाकी चोरटे चतुर्भुज
By Admin | Updated: January 7, 2017 01:27 IST2017-01-07T01:27:05+5:302017-01-07T01:27:19+5:30
१८ दुचाकी जप्त : स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची कारवाई

दुचाकी चोरटे चतुर्भुज
नाशिक/मालेगाव : जिल्ह्यातील विविध भागांतून वाहने चोरी करणाऱ्या दोघांना पकडण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. संशयितांकडून १८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या दोघांच्या अटकेने अनेक चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
सागर अशोक वाघ (भाटगाव, ता. येवला) आणि मनोज ऊर्फमुन्ना बळीराम पवार (आघार, ता. मालेगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांनी मालेगाव शहर, येवला, लासलगाव यासह ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठ, मार्केट यार्ड, शाळा-कॉलेजेस आदि ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याचे पुढे आले आहे. पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. मालेगाव युनिटचे उपनिरीक्षक बालाजी मुसळे, हवालदार सुनील आहिरे, विकास शिरोळे, सुहास छत्रे, वसंत महाले, राजू मोरे, राकेश उबाळे, देवा गोविंद, रतिलाल वाघ आदिंच्या पथकाने भाटगाव गाठून सागर वाघ याच्या मुसक्या आवळल्या असता वाहनचोरीचा उलगडा झाला. वाघ याच्या ताब्यातून पोलिसांनी दोन दुचाकी जप्त केल्या.
या चोरी केलेल्या दुचाकी आघार येथील अमृत ऊर्फआबा आत्माराम बच्छाव आणि ज्ञानेश्वर
बाळासाहेब शिंदे या दोघांच्या ताब्यात दिल्या. चोरीची वाहने बच्छावच्या गॅरेजवर विक्र ीसाठी ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आघार फाट्यावरील भैरवनाथ दुचाकी गॅरेजवर छापा मारला. या छाप्यात विविध कंपन्यांच्या १८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, संशयितानी वाहनांचे नंबर बदलले आहेत. या प्रकरणी संशयितांविरोधात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, नंबर प्लेट्स खऱ्या नसल्याने पोलिसांना मूळ मालकांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. वाहन चोरी झालेल्या मालकांनी चेसीज व इंजिन नंबर सोबत ठेवून येवला शहर पोलीस ठाण्यात संपर्कसाधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आहे.
(प्रतिनिधी)