भाजपाचे दो-बारा, विरोधकांचे तीन तेरा

By Admin | Updated: February 25, 2017 00:59 IST2017-02-25T00:59:05+5:302017-02-25T00:59:19+5:30

धक्कादायक निकाल : सेना-मनसेची वाताहत

Two-twelve BJP candidates, three thirteen of the opposition | भाजपाचे दो-बारा, विरोधकांचे तीन तेरा

भाजपाचे दो-बारा, विरोधकांचे तीन तेरा

धनंजय वाखारे : नाशिक
महापालिका निवडणुकीत नाशिक पूर्व विभागात दोन जागांवरून १२ जागांवर झेप घेणाऱ्या भाजपाने अनपेक्षितपणे मुसंडी मारली तर विरोधकांचे तीन तेरा वाजले. मागील निवडणुकीत सर्वाधिक नऊ जागा मिळविणाऱ्या मनसेला कशीबशी एक जागा राखता आली. सेनेला तर भोपळाही फोडता आला नाही. जुने नाशिकमधील गावठाण भागात कॉँग्रेस - राष्ट्रवादीने आपला दबदबा कायम ठेवला. विभागात काही धक्कादायक निकालांची नोंद झाली. पूर्व विभागावर भाजपाने पकड मिळविल्याने गावठाण पुनर्विकासासह पूररेषेचा प्रश्न सोडविण्याचे दायित्व पक्षावर येऊन पडले आहे.  नाशिक पूर्व विभागात सन- २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेच्या लाटेत सेना-भाजपाला जबर फटका बसला होता. केवळ कॉँग्रेस-राष्ट्रवादीने तग धरली होती. मनसेचे तब्बल ९ नगरसेवक निवडून आले होते, तर राष्ट्रवादी ५, कॉँग्रेस ४, भाजपा २, शिवसेना १ आणि अपक्ष ३ असे बलाबल होते. यंदा बहुसदस्यीय प्रभाग रचना राबविताना विभागातील प्रभाग क्रमांक १५ वगळता अन्य पाच प्रभागांमध्ये प्रत्येकी चार उमेदवार निवडून द्यायचे होते. पॅनलपद्धतीत आकड्यांची संख्या वाढण्याचा भाजपाचा होरा काही प्रमाणात तरी खरा ठरला. जुने नाशिक भागातील गावठाण परिसरात कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आपला वरचष्मा कायम ठेवला. याशिवाय, आगरटाकळी-उपनगर परिसरातही मुसंडी मारत सेना-भाजपा-मनसेला घाम फोडला.  मात्र, द्वारका, भाभानगर, डीजीपीनगर, वडाळागाव, इंदिरानगर ते राजीव नगरपर्यंतच्या पट्ट्यात भाजपाने एकहाती विजय संपादन करत उच्च व मध्यमवर्गीयांमध्ये भाजपाचीच क्रेझ असल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रभाग १३ मध्ये मनसे-कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा आघाडीचा पॅटर्न यशस्वी ठरला. पॅनलमधील वत्सला खैरे यांची मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही विजयाला गवसणी घालताना दमछाक झाली तर राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या गजानन शेलार यांनी माजी महापौर शिवसेनेचे यतिन वाघ यांना चितपट केले. मनसेच्या सुरेखा भोसले यांच्यामुळे या आघाडीला रविवार कारंजा भागातील मोठे बळ मिळाल्याने पॅनलच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. शाहू खैरे यांनी आपल्या ‘संस्कृती’चा पाया अजूनही मजबूत असल्याचे दाखवून दिले.  प्रभाग क्रमांक ४ मध्ये माजी नगरसेवक सय्यद मुशीर वगळता शोभा साबळे, समिना मेमन व जीन सुफीयान यांचा विजय अपेक्षितच होता. अपक्ष म्हणून लढणाऱ्या सय्यद मुशीर यांनी पुन्हा एकदा सभागृहात एण्ट्री केली आहे. प्रभाग १६ मध्ये प्रा. कुणाल वाघ, विजय ओहोळ, वंदना मनचंदा, मेघा साळवे, नंदिनी जाधव यांनी चांगली लढत दिली. परंतु, कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सुषमा रवि पगारे, राहुल दिवे व आशा तडवी यासारखे ताकदवार उमेदवार दिल्याने त्यांच्यापुढे कुणाची मात्रा चालली नाही.  गावठाणात कॉँग्रेस-राष्ट्रवादीने दबदबा कायम ठेवला असताना इंदिरानगर, डीजीपीनगर, द्वारका या भागात भाजपाने आश्चर्यकारक मुसंडी मारली असली तरी विजयी उमेदवारांमध्ये आयात केलेल्यांचाच समावेश आहे.
एकमेव सतीश कुलकर्णी वगळता अर्चना थोरात, प्रथमेश गिते, रूपाली निकुळे, चंद्रकांत खोडे, दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे हे मूळ भाजपेयी नाहीत. पूर्व विभागात भाजपाच्या पारड्यात भरभरून मते पडल्याने यापुढील काळात गावठाणासह अन्य भागांतील विकासकामांकडे पक्षाला अधिकाधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

Web Title: Two-twelve BJP candidates, three thirteen of the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.