आडगावला दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

By Admin | Updated: July 24, 2016 02:08 IST2016-07-23T23:39:19+5:302016-07-24T02:08:29+5:30

आडगावला दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

Two students die in drown in Adgawa | आडगावला दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

आडगावला दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

पंचवटी : आडगाव शिवारातील समर्थनगरमध्ये असलेल्या एका पडक्या विहिरीमध्ये बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२३) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली़ ओमकार श्रीराम कारंजकर (१३) व शुभम सोमनाथ शिंदे (१४, रा़दोघेही राहणार श्री स्वामी समर्थनगर, आडगाव शिवार, नाशिक) अशी या दुर्दैवी मुलांची नावे असून, शाळेतून घरी परतत असताना या दोघांनी या विहिरीमध्ये उडी मारल्याची चर्चा आहे़ दरम्यान, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थनगरमधील ओमकार कारंजकर हा पेठे विद्यालयात आठवीच्या वर्गात, तर शुभम शिंदे हा आडगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होता़ शनिवारी सकाळी लवकर शाळा सुटल्यानंतर हे दोघेही मित्र मदर तेरेसा आश्रमाच्या संरक्षण भिंतीच्या पाठीमागे असलेल्या अंडे यांच्या शेतातील रस्त्याने घरी जात होते़ या रस्त्यावर एक जुनी पडीक विहीर असून, पावसाच्या पाण्यामुळे ती पूर्णपणे भरलेली आहे़
प्रथम ओमकार व त्यापाठोपाठ शुभमने या विहिरीत उडी मारली़ मात्र या या विहिरीत पाणी कमी व गाळ जास्त असल्याने हे दोघेही गाळात अडकले़ ही घटना पाहणाऱ्यांनी आरडाओरडही केली, मात्र तत्काळ मदत उपलब्ध झाली नाही़ या दोघांसोबत असलेल्या शुभम शिंदेच्या धाकट्या भावाने घरी पळत जाऊन हा प्रकार सांगितल्यानंतर सर्वांनी या विहिरीकडे धाव घेतली़ मात्र यापूर्वीच नीलेश अशोक जाधव या युवकाने ओमकारला पाण्याबाहेर काढून काठावरील नागरिकांना उपचारासाठी नेण्याची सूचना केली़ त्यानंतर शुभमच्या शोधासाठी नीलेश पुन्हा विहिरीत उतरला़ शुभम हा गाळात फसल्याने त्यास बाहेर काढण्यासाठी जाधवला वेळ लागला व तोपर्यंत आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारीही हजर झाले़ पोलिसांनी ओमकारला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, तर शुभमचा अधिक वेळ पाण्यात असल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला़.
ओमकार हा कारंजकर कुटुंबीयांचा एकूलता एक मुलगा असून, त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे़ तर शुभम शिंदेच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे़ या घटनेमुळे आडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ (वार्ताहर)

Web Title: Two students die in drown in Adgawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.