साधुग्राममध्ये दोन पिठाच्या गिरण्या
By Admin | Updated: August 14, 2015 00:19 IST2015-08-14T00:16:42+5:302015-08-14T00:19:23+5:30
मेडिकल स्टोअर्स गायब : पालिकेमार्फत १११ स्टॉल्सचा लिलाव

साधुग्राममध्ये दोन पिठाच्या गिरण्या
नाशिक : तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये महापालिकेने विविध व्यावसायिकांसाठी उभारलेल्या १३१ स्टॉल्सपैकी १११ स्टॉल्सचा लिलाव झाला असून, त्या माध्यमातून ४२ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, यामध्ये केवळ दोघाच व्यावसायिकांनी पीठ गिरणी थाटण्यास तयारी दर्शविली, तर अन्न व औषध प्रशासनाच्या नियमावलीमुळे मेडिकल स्टोअर्स उभारण्यास अडचणी उत्पन्न झाल्या आहेत.
महापालिकेने साधुग्राममध्ये दाखल झालेल्या साधू-महंतांना भाजीपाल्यापासून किराणा माल, कपडे यांपर्यंत विविध वस्तू उपलब्ध व्हाव्यात याकरिता सेक्टरनिहाय १३१ स्टॉल्स उभारले आहेत. या स्टॉल्ससाठी दोन टप्प्यांत लिलावप्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात ९४ स्टॉल्सचा लिलाव झाला, तर दुसऱ्या टप्प्यात १७ स्टॉल्सला व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळाला. अजूनही २० स्टॉल्स शिल्लक असून, लवकरच त्यासंबंधीही लिलावप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. सदर स्टॉल्समध्ये पिठाच्या गिरण्यांसाठीही जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते. साधूंना गहू दळण्यासाठी शहरातच धाव घ्यावी लागणार असल्याने साधुग्राममध्येच पिठाची गिरणीही उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते. आतापर्यंत केवळ दोनच व्यावसायिकांनी पिठाची गिरणी लावण्याची तयारी दाखविली असली तरी, त्यांना परवानग्या स्वत:च घ्यायच्या आहेत. याशिवाय साधुग्राममध्ये मेडिकल स्टोअर्सही उभारण्याचे नियोजन होते; परंतु नियमावलीनुसार कुठेही मेडिकल स्टोअर्स थाटता येत नसल्याने तो प्रस्तावही बारगळला आहे. (प्रतिनिधी)