रेशन घोटाळ्यातील आणखी दोघा संशयितांना अटक
By Admin | Updated: December 6, 2015 00:02 IST2015-12-05T23:57:24+5:302015-12-06T00:02:24+5:30
रेशन घोटाळ्यातील आणखी दोघा संशयितांना अटक

रेशन घोटाळ्यातील आणखी दोघा संशयितांना अटक
नाशिक : कोट्यवधी रुपयांच्या रेशन धान्य घोटाळ्यातील घोरपडे बंधूंचे साथीदार काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले या दोघा संशयितांना वाडीवऱ्हे पोलिसांनी शुक्रवारी (दि़४) अटक केली़ या दोघांसह पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या लक्ष्मण पटेल या तिघांना विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांनी १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, यातील प्रमुख सूत्रधार अरुण घोरपडे, त्यांची मुलगी पूनम होळकर व जितूभाई विरजी ठक्कर हे तिघे फरार आहेत़
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पोलीस कोठडीची मागणी करताना युक्तिवादात सांगितले की, संशयित घोरपडे बंधू व त्यांच्या टोळीने सरकारी धान्याचा काळाबाजार करून प्रचंड पैसा कमावला़तसेच पैशांच्या व्यवहारासाठी त्यांनी दहा ते अकरा बोगस कंपन्या स्थापन केल्या़ त्यापैकी महालक्ष्मी कार्पोरेशनचा मालक संशयित काशीनाथ सदाशिव पाटील (३८, शिवशक्ती चौक, सिडको) हा असून धान्याची वाहनाद्वारे वाहतूक करणारे संशयित ज्ञानेश्वर दशरथ घुले (३४, पाथर्डी फाटा, नाशिक) या दोघांचा समावेश आहे़
या घोटाळ्यातील संशयित लक्ष्मण धरमसी पटेल याच्या कंपनीला एका वर्षात १० लाखांचा, तर घोटाळा झाल्याच्या दुसऱ्या वर्षी सव्वा कोटी रुपयांचा नफा झाला़ त्यामुळे एका वर्षात इतका नफा कसा झाला? मूळचा रिक्षाचालक व महालक्ष्मी कार्पोरेशनचा मालक काशीनाथ पाटील याच्या कंपनीतून ६६ लाख रुपये देण्यात आले आहेत़ तर घोरपडे बंधूंना धान्य पोहोचविण्यासाठी वाहन पुरविणारे व ज्ञानेश्वर घुले याने फरार कालावधीत मदत केल्याने या दोघांच्याही पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली़
संशयित लक्ष्मण पटेल याचे वकील अॅड़ राहुल कासलीवाल यांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई योग्य नसल्याचा युक्तिवाद केला, तर पाटील व घुले यांच्या वकील अॅड़ शबनम मेनन यांनी संशयित रिक्षाचालक काशीनाथ पाटील याच्या नावावर महालक्ष्मी कार्पोरेशन नावाची कंपनी असल्याचे, तसेच ज्ञानेश्वर घुले शेतकरी असून त्याचा सहभाग नसल्याचे सांगितले़ दोन्ही बाजूच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर संशयित पाटील व घुले या दोघांसह कोठडीची मुदत संपलेले पटेल यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़
दरम्यान, या रेशन घोटाळ्यातील संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे (रा़ १०, विश्वास बंगला, गोविंदनगर, नाशिक), मगन पवार व रमेश पाटणकर (दोघेही रा़ शिवशक्ती चौक, सिडको) हे चौघे ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत़ (प्रतिनिधी)