मूलभूत सुविधा उभारणीसाठी दोन महिन्यांचा कालावधी
By Admin | Updated: November 10, 2014 00:34 IST2014-11-10T00:33:01+5:302014-11-10T00:34:14+5:30
मूलभूत सुविधा उभारणीसाठी दोन महिन्यांचा कालावधी

मूलभूत सुविधा उभारणीसाठी दोन महिन्यांचा कालावधी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या सात-आठ महिन्यांवर येऊन ठेपल्याने तपोवनात महापालिकेच्या ताब्यातील ५४ एकर जागेत साधुग्राम उभारणीसाठी सपाटीकरण, ड्रेनेजलाइन, अंतर्गत रस्ते, सेवा रस्ते आदि कामांना सुरुवात झाली असली, तरी साधुग्राममध्ये देण्यात येणाऱ्या शौचालय, स्नानगृह, पाणीपुरवठ्यासाठी स्टॅण्डपोस्ट्स यांसारख्या मूलभूत सुविधांना पालिकेच्या कार्यादेशाची प्रतीक्षा आहे. सदर काम अहमदाबाद येथील ठेकेदाराला देण्यात आले असून, शौचालय-स्नानगृहांचे सॅम्पल्स तयार आहेत. या मूलभूत सुविधा उभारणीसाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात विविध आखाड्यांचे, संप्रदायांचे साधू-महंत लाखोच्या संख्येने नाशिकला दाखल होत असतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था साधुग्राममध्ये केली जात असते. येत्या सिंहस्थात एकूण ३२३ एकर जागेवर साधुग्रामची उभारणी करण्याचे नियोजन आहे. महापालिकेने आपल्या ताब्यातील ५४ एकर जागेवर साधुग्राम उभारणीच्या दृष्टीने प्राथमिक कामांना सुरुवात केली आहे. त्यानुसार जागेचे सपाटीकरण सुरू असून, ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. अंतर्गत रस्ते, सेवा रस्त्यांचीही कामे सुरू आहेत; मात्र ही कामे संथ गतीने सुरू असल्याने पुढच्या कामांना विलंब होत आहे. साधुग्राममध्ये साधू-महंत यांच्यासाठी प्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्लॉट्सवर संबंधित आखाड्यांनी आपल्या खर्चाने निवारा शेड्स उभे करायचे आहेत. परंतु शौचालय, स्नानगृह, पथदीप, पाणीपुरवठा, ड्रेनेजलाइन या मूलभूत सुविधा संबंधित खात्यांकडून पुरविल्या जाणार आहेत. शौचालय-स्नानगृह, स्टॅण्डपोस्ट्स या कामांचा ठेका अहमदाबाद येथील लल्लूजी अॅण्ड सन्स या कंपनीला देण्यात आला असून, ठेकेदाराकडून त्यासंबंधी सॅम्पल्सही तयार आहेत. त्यामध्ये महापालिकेने सीमेंटचे प्लींथ असलेल्या आणि फायबरचे भांडे असलेल्या शौचालय उभारणीला पसंती दिली आहे. साधुग्राममध्ये सुमारे ३६०० शौचालये व स्नानगृह उभारण्याचे नियोजन आहे; परंतु त्याबाबतचा अंतिम कार्यादेश ठेकेदाराच्या हाती नसल्याने काम रखडले आहे. सदर काम नोव्हेंबरमध्येच सुरू होणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे; परंतु महापालिकेकडून त्यासंबंधी कसलीही हालचाल नसल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. साधुग्राममध्ये एका ब्लॉकमध्ये पत्र्याचे शेड उभारून आठ शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे, तर स्नानगृहात शॉवरचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक स्नानगृहाबाहेर पिण्याच्या पाण्यासाठी स्टॅण्डपोस्टही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी दीड ते दोन महिने लागणार आहेत. त्यातून सुमारे दीडशे ते दोनशे मजुरांना रोजगार मिळणार आहे. मूलभूत सुविधांच्या कामांना विलंब झाल्यास पुढील कामेही रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम नियोजनावर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)