दोन गावठी कट्टे, काडतुसे जप्त
By Admin | Updated: April 20, 2017 01:00 IST2017-04-20T00:55:26+5:302017-04-20T01:00:56+5:30
नाशिकरोड : मालधक्का रोड गुलाबवाडी सिद्धार्थनगर येथील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेल्या घरातून नाशिकरोड पोलिसांनी दोन गावठी कट्टे, दोन काडतुसे, कोयता, दोन चाकू जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

दोन गावठी कट्टे, काडतुसे जप्त
नाशिकरोड : मालधक्का रोड गुलाबवाडी सिद्धार्थनगर येथील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेल्या घरातून नाशिकरोड पोलिसांनी दोन गावठी कट्टे, दोन काडतुसे, कोयता, दोन चाकू जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. बंद असलेल्या घराच्या दरवाजाचा तुटलेल्या कडीकोयंड्यामुळे सापडलेली हत्यारे पहिल्यापासून होती, का कोणी आणून ठेवली याचा शोध पोलीस घेत आहे.
आंबेडकर जयंतीनिमित्ताने नाशिकरोड पोलीस आंबेडकररोड परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुलाबवाडी सिद्धार्थनगर येथील एका घरात गावठी कट्टे व हत्यारे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. आर. ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, सुदाम भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांना ज्या घराची माहिती मिळाली होती त्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला व खाली पडलेल्या परिस्थितीत होता. पोलिसांनी दोन शासकीय पंचांसमवेत सिद्धार्थनगरमधील दिलीप हरिशंकर धाकड यांच्या घराची झडती घेतली असता लाकडी मूठ असलेले दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे, कोयता, दोन चाकू, १० हजार १७५ रुपयांची हत्यारे मिळून आली.
ज्या घरांमध्ये हत्यारे आहेत अशी गुप्त माहिती मिळाली होती त्या दिलीप धाकड यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा पोलीस येण्याअगोदरच खाली तुटून पडलेला होता. यामुळे मिळालेली हत्यारे पहिल्यापासूनच घरात होती का ती जाणूनबुजून आणून ठेवली याचा पोलीस शोध घेत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.