वडाळागावात दोन अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले
By Admin | Updated: February 17, 2017 00:35 IST2017-02-17T00:34:49+5:302017-02-17T00:35:00+5:30
फुले झोपडपट्टीतील घटना : कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाइल

वडाळागावात दोन अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले
नाशिक : अपक्ष उमेदवाराची प्रचारसभेत दुसऱ्या अपक्ष उमेदवाराची प्रचारफेरी आल्यानंतर दोघांमध्ये आरोप - प्रत्यारोप होऊन कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाइल झाल्याची घटना गुरुवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़ या हाणामारीदरम्यान पोलीस वेळेवर पोहोचल्याने पुढील मोठा अनर्थ टळला़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक ३० मध्ये दोन अपक्ष उमेदवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ रात्रीच्या वेळी एका उमेदवाराची प्रचारसभा, तर दुसऱ्याची प्रचारफेरी सुरू होती़ या उमेदवारांचे कार्यकर्ते सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत समोरासमोर आले व त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले़ यानंतर अचानक दोन्ही उमेदवारांचे समर्थक एकमेकांशी भिडले़ मात्र, या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली़
दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी मोठा जमाव जमल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता़ या घटनेमुळे वडाळागावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़