शहरातील अडीचशे खासगी रुग्णालये, प्रसूतीगृहे नोंदणीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 23:57 IST2016-03-18T23:45:55+5:302016-03-18T23:57:22+5:30
मनपाचे आवाहन : अन्यथा कारवाईचा बडगा

शहरातील अडीचशे खासगी रुग्णालये, प्रसूतीगृहे नोंदणीविना
नाशिक : शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी मुंबई सुश्रुषागृहे अधिनियम १९४९ व सुधारित नियम २००६ अन्वये रुग्णालये व प्रसूतीगृहे यांची नोंदणी तसेच नूतनीकरण बंधनकारक असतानाही सुमारे अडीचशे खासगी रुग्णालये व प्रसूतीगृहे यांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून नोंदणी, नूतनीकरण प्रमाणपत्र घेतलेले नाही. संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांना महापालिकेने नोंदणी तसेच नूतनीकरणासाठी आवाहन करतानाच दंडात्मक कारवाईचाही इशारा दिला आहे.
महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुग्णालय, प्रसूतीगृहे यांनी नर्सिंगहोमची नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणी केल्यानंतर तीन वर्षांनंतर नूतनीकरणही आवश्यक आहे. शहरातील एकूण १७०१ रुग्णालयांची नोंदणी महापालिकेकडे आहे. त्यातील ३३३ रुग्णालये बंद स्थितीत असून ६५२ रुग्णालयांनीच नोंदणी केलेली आहे. दरम्यान, यामध्ये ८२८ क्लिनिक असल्याने आणि जेथे खाटांची सुविधा नाही अशा क्लिनिकसाठी नर्सिंग होम अॅक्टनुसार नोंदणी करण्याची गरज नसल्याचे महापालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. महापालिकेकडे सुमारे अडीचशे रुग्णालये व प्रसूतीगृहांनी नोंदणी तसेच नूतनीकरणच केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांना नोंदणी किंवा नूतनीकरणासाठी आवाहन केले आहे. संबंधितांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीसाठी नूतनीकरण करून घ्यावे अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिला आहे. नोंदणी व नूतनीकरण न करणाऱ्यांना दंडाची तरतूद असून त्यासाठी प्रथम वर्षी पाच हजार रुपये आणि त्यानंतर प्रतिदिन ५० रुपये दंड आकारण्यात येतो. (प्रतिनिधी)