ठोका चुकविणारे ते दोन तास..
By Admin | Updated: February 26, 2015 00:01 IST2015-02-26T00:01:23+5:302015-02-26T00:01:32+5:30
.दुर्घटना टळली : बॉम्बशोधक-नाशक पथकाची तत्परता; खोक्यामध्ये आढळला बॉम्ब

ठोका चुकविणारे ते दोन तास..
नाशिक : वेळ दुपारी दीड वाजेची. ठिकाण शरणपूररोड येथील राजीव गांधी भवनासमोरील सुयोजित हाईट व्यापारी संकुल. येथील वाहनतळात असलेल्या एका खोक्यामध्ये बॉम्ब असल्याची वार्ता कर्णोपकर्णी पसरते अन् काही क्षणातच पोलीस, बॉम्बशोधक-नाशक पथकाचा ताफा घटनास्थळी दाखल होतो. सुमारे पावणे दोन तास चाललेल्या बॉम्ब निकामी करण्याच्या प्रयत्नांना अखेर सव्वातीन वाजता यश आले अन् परिसरातील शेकडो नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
घडले असे, संकुलामधील पहिल्या मजल्यावर सुयोजित बिल्डकॉनचे कार्यालय आहे. या कार्यालयात एक अज्ञात तरुण तोंडाला रूमाल बांधून व डोळ्याला चष्मा लावून येतो. स्वागत कक्षात बसलेल्या एका व्यक्तीला तो तरुण मराठीत विचारतो, येथे कोणी आहे का, पार्सल द्यायचे आहे आणि दूरध्वनी नियंत्रकाच्या टेबलवर बॉम्ब असलेला खोका ठेवून तो तत्काळ निघून जातो. काही मिनिटांतच कार्यालयाचा दूरध्वनी खणखणतो तो दूरध्वनी शिपाई उचलतो आणि त्यावरून विचारण होते, ‘पार्सल मिळाले का, ते उघडून बघा, राजेगावकर कुठे आहेत? दरम्यान, प्रशासकीय अधिकारी जेवण करत असताना त्यांचे याकडे लक्ष जाते व ते उठून तातडीने दूरध्वनी हातात घेत कोण बोलतंय, असा प्रश्न करतात तेव्हा समोरून हिंदीतून खोका उघडण्याचा आग्रह होतो व दूरध्वनी कट केला जातो. त्यानंतर शिपाई हळूच एका बाजूने खोका उघडतो. तेव्हा त्यामधून दुर्गंधी येते आणि प्रशासकीय अधिकाऱ्याचा संशय बळावतो, ते तत्काळ शिपायाला सदर खोका खाली घेऊन जाण्यास सांगतात. त्यानुसार शिपाई संकुलाच्या मागील बाजूस वाहनतळाजवळ असलेल्या विद्युत जनित्राच्या मागे आणून खोका ठेवतो. या दरम्यान, अधिकारी पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती देतात. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्वरेने प्रकाराची माहिती बिनतारी संदेश यंत्रणेवरून बॉम्बशोधक-नाशक पथकाला कळवितात. दोन वाजेच्या सुमारास बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल होते. आधुनिक स्फोटक धातूशोधक यंत्रणा घेऊन कर्मचारी त्या खोक्याची तपासणी करतात व त्यांना ‘धोका’ असल्याची खात्री पटते. त्यानंतर तातडीने हालचाली करत खोक्याची संगणकीकृत यंत्रणेद्वारे तपासणी करतात. एक कर्मचारी ‘सेफ्टी सूट’ हेल्मेट, विशिष्ट चष्मा लावून तयार होतो आणि सदर खोका जनित्रापासून लांब करत वाहनतळाच्या मुख्य रस्त्याच्या मोकळ्या जागेत आणून ठेवतो. किमान वीस ते तीस फूट अंतरावरून स्प्रे फायर करून खोक्यामधील स्फोटक निकामी करतो.