नाशिकरोड : देवळालीगाव येथील श्री म्हसोबा महाराज यात्रेत किरकोळ कारणावरून दोन गटांत युवकांमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी मारामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवार बाजार येथील अक्षय हिरामण मुरकुटे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्री म्हसोबा महाराज यात्रेत मित्र किरण कसबे, विकी पात्रे, ओम देशमुख जात असताना आकाश भालेराव याला धक्का लागल्याने त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याला समजाविण्यास गेले असता आकाश भालेराव व त्याच्या दोन मित्रांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून हातातील कडे किरण कसबे याच्या डोक्यास लागल्याने तो जखमी झाला. गोरेवाडी येथील आकाश अनिल भालेराव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्री म्हसोबा महाराज यात्रेत बालाजी हॉस्पिटलजवळ गर्दीमध्ये जात असताना किरण कसबे यास धक्का लागला. त्यामुळे किरण व त्याचे मित्र अक्षय मुरकुटे, विकी किसन पात्रे, ओम तुषार देशमुख यांनी मला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या हातातील लोखंडी कडे उजव्या कानाच्या बाजूला लागल्याने दुखापत होऊन जखमी झालो. या मारामारीमुळे जत्रेत धावपळ होऊन तणावाचे वातावरण पसरले होते.
म्हसोबा यात्रेत दोन गटांत हाणामारी; गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:12 IST