नाशिक : आडगाव शिवारातील छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयातून मंगळवारी (दि. २६) मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा घराकडे दोन दुचाकींवरून भरधाव 'रेसिंग' करत प्रवास करताना दुचाकीचालकांचे नियंत्रण सुटले. दोन्ही दुचाकी दुभाजकावर आदळल्या. यामध्ये दोघा तरुण मित्रांचा मृत्यू झाला. आदर्श सोनवणे (२६) व रोहित भडांगे (२५), असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.
मूळ सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील रहिवासी असलेले आदर्श व रोहित हे अंबड येथील औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत नोकरीला होते. सध्या अंबड दत्तनगर कारगिल चौकात हे सध्या वास्तव्यास होते. हे दोघेजण एका मित्राची हळद असल्याने त्या हळदीच्या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयात गेले होते. तेथून ते रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पुन्हा अंबडकडे निघाले असताना, ही दुर्घटना घडली. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी (एमएच१५ एचव्ही ४२०६), (एम. एच१५ एचएफ ६६४३) भरधाव चालवत एकमेकांत स्पर्धा करत असताना छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील सिद्धिविनायक चौकातील गतिरोधकावर तोल जाऊन दोन्ही दुचाकी एकमेकांना धडकल्या. यामुळे दोघांच्याही डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना, त्यांचा मृत्यू झाला. आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेल्मेट परिधान केले असते तर वाचला असता जीव
रेसिंगच्या नादात वेगाने दुचाकी नेताना दुचाकीचा तोल जाऊन दुचाकी दुभाजकावर आदळून अपघातात ठार झालेल्या दोघाही युवकांनी डोक्यात हेल्मेट परिधान केलेले नव्हते. डोक्यात हेल्मेट असते, तर कदाचित या दोघांचाही जीव वाचला असता, असे पोलिसांनी सांगितले.
अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून पुन्हा घराकडे दोन वेगवेगळ्या दुचाकींवरून जाताना दुचाकींची रेस लावून वेगाने जाण्याच्या प्रयत्नात दुचाकी गतिरोधकावरून उडून थेट दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात आदर्श सोनवणे व रोहित भडांगे या दोघा युवकांचा मृत्यू झाला. सदर अपघाताच्या घटनेचा थरार परिसरात एका सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.