दोन माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश
By Admin | Updated: September 3, 2014 00:17 IST2014-09-02T21:54:44+5:302014-09-03T00:17:39+5:30
नवचैतन्य: मातोश्रीवर बांधले शिवबंधन...

दोन माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश
नाशिक: राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडून जिल्ह्यातील माजी आमदार अनुक्रमे संजय पवार व काशिनाथ मेंगाळ यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
मनमाड: राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देउन बाहेर पडलेले माजी आमदार संजय पवार यांनी आज मुंबई येथे उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.मातोश्रीवर शिवबंधन बांधून शिवसेनेसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पंकज भुजबळ यांच्याशी अटीतटीची लढत देऊन पराभूत झालेल्या संजय पवारांनी काही वर्षांपुर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी कॉंग्रेस मधे प्रवेश केला होता.
मुंबई येथे उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पवार यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले. या वेळी संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर ,माजी मंत्री बबनराव घोलप,जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार आर.ओ. पाटील,सुहास कांदे हे उपस्थित होते.
घोटी : मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणाऱ्या माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.सलग दहा वर्ष मतदार संघावर भगवा फडकवणाऱ्या मतदारसंघातील शिवसैनिकांनी पुन्हा मतदारसंघावर भगवा फडकविण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून यादृष्टीने मतदारसंघात वातावरणनिर्मितीसाठी दोन मेळावे घेवून एका मेळाव्यात वनविभागाचे अधिकारी चंद्रकांत खाडे यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश देवून पक्षाची ताकद वाढविली आहे.तर दुसरीकडे आदिवासी बांधवाना शिवसेनेच्या प्रवाहात आणण्यासाठी माजी आमदार शिवराम झोले यांनी आदिवासी बांधवाचा मेळावा घेवून वातावरण निर्मिती केली आहे.
आज शिवसेना भवनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह प.स.सदस्य संतोष दगडे,खंडेराव धांडे,साहेबराव उत्तेकर,अशोक नाठे,संजय गुळवे,काशिनाथ भोर,रामदास आडोळे,आदीना शिवसेनेत प्रवेश दिला.यावेळी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर,खासदार हेमंत गोडसे,जिल्हाप्रमुख विजय करंजकर,उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव,तालुकाप्रमुख भगवान आडोळे,माजी आमदार शिवराम झोले आदी उपस्थित होते.(वार्ताहर)