तुकाराम दिघोळेंसह दोन संचालकांचे राजीनामे
By Admin | Updated: May 28, 2014 01:04 IST2014-05-28T00:22:10+5:302014-05-28T01:04:08+5:30
नासाका संचालकांत खळबळ : वीजपुरवठा केला खंडित

तुकाराम दिघोळेंसह दोन संचालकांचे राजीनामे
नासाका संचालकांत खळबळ : वीजपुरवठा केला खंडित
नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ आणि कामगार युनियनकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच, नासाकाच्या तीन संचालकांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. त्यात भरीस भर म्हणून दीड लाखाची वीजपी थकल्याने महावितरणने नासाकाचा वीजपुरवठा खंडित केल्याने तीन दिवसांपासून नासाका अंधारात बुडाला आहे.
आठवडाभरापूर्वीच नासाकाच्या कार्यक्षेत्रावर संचालक, सभासद व संचालकांची बैठक होऊन नासाका बंद होण्यापासून वाचविण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानंतर कारखान्याची सुमारे २५ ते ३० कोटींची शंभर क्िंवटल साखरेची पोती विकण्यासंदर्भात जिल्हा बॅँक व नासाका व्यवस्थापन व कामगार युनियन यांची संयुक्त बैठक होऊन त्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. नाशिक साखर कारखान्याकडे महावितरणची दीड लाखाची थकबाकी असल्याने महावितरणने नासाकाचा वीजपुरवठा खंडित केल्याने गेल्या तीन दिवसांपासून नासाका अंधारात आहे. त्याचप्रमाणे नाशिक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्यासह संतू पाटील व केरू पाटील धात्रक या तीन संचालकांनी राजीनामा दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नासाकाची अवस्था बिकट असल्याने पुन्हा नासाका सुरू होण्याची शक्यता फारच कमी असल्यानेच या तीन संचालकांनी राजीनामे दिल्याची चर्चा असली, तरी या तीनही संचालकांनी राजीनामा घरगुती अडचणीमुळे देत असल्याचे नमूद केले आहे. हे राजीनामे व्यवस्थापक देवीदास मोठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून, येत्या ३० मेनंतर संचालक मंडळाची बैठक होणार असून, बैठकीत हे राजीनामे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नासाकाचा वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत होण्यासाठी दीड लाखाची मदत जिल्हा बॅँकेच्या वतीने नासाकाला करण्यात येणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)