निमाणीतून दोन तर म्हसरूळ परिसरातून एक गावठी कट्टा जप्त
By Admin | Updated: July 5, 2016 16:25 IST2016-07-05T16:25:07+5:302016-07-05T16:25:07+5:30
पंचवटीतील निमाणी बसस्थानक व म्हसरूळ परिसरातून पोलिसांनी तीन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे सोमवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास जप्त केले आहेत़

निमाणीतून दोन तर म्हसरूळ परिसरातून एक गावठी कट्टा जप्त
ऑनलाइन लोकमत
पंचवटी, दि. ५ : पंचवटीतील निमाणी बसस्थानक व म्हसरूळ परिसरातून पोलिसांनी तीन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे सोमवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास जप्त केले आहेत़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात एक व म्हसरूळ पोलीस ठाण्यात तिन अशा चौघा संशयितांवर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निमाणी बसस्थानकात रात्रीच्या सुमारास काही संशयित गावठी कट्टे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार निमाणी बसस्थानक परिसरात पंचवटी पोलिसांनी सापळा लावला होता़ त्यानुसार रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित सुरेश दिलीप पिठवा (२७, रा़ प्लॉट नंबर ६५, सुधीन हॉटेलच्या मागे, तपोवन क्रॉसिंग, पंचवटी) हा संशयास्पदरित्या फिरत असताना पोलिसांनी त्याची झडती घेतली़ त्याच्याकडे दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसे आढळून आली़ संशयित पिठवाविरूद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनला दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोलपंपाजवळ गावठी कट्टयाची विक्री करण्यासाठी काही तरूण येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांनी कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी सापळा रचला होता़ सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास पेट्रोलपंपाजवळील शिवांजली बिल्डिंगजवळील चहाच्या टापरीजवळ संशयित अल्ताफ मिसार कोकणी (२२, रा़स्वारबाबनगर, सातपूर), विनायक आनंदा काळे (१९, रा़राजवाडा, सातपूर, नाशिक) व रौफ कमरुद्दीन बागवान (४१, रा़भारतननगर, वडाळारोड) हे तिघे आढळून आले़
गुन्हे शाखेने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता संशयित कोकणी व काळे या दोघे बेकायदेशीरपणे गावठी कट्टा विकण्यासाठी आल्याचे तर या कट्टयासाठी बागवान याने पैसे दिल्याचे समोर आले़ पोलिसांनी या तिंघाकडून ३० हजार रुपये किमतीचा एक देशी कट्टा, ९० हजार रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल, एक हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस व एक हजार रुपये किमतीचा नोकिया मोबाईल फोन जप्त केला आहे़ या तिघा संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़