वाडीवऱ्हे सोने लुटीतील दोघांना अटक
By Admin | Updated: April 29, 2015 23:37 IST2015-04-29T23:36:45+5:302015-04-29T23:37:09+5:30
इगतपुरी न्यायालयात हजर : बारा दिवसांची पोलीस कोठडी

वाडीवऱ्हे सोने लुटीतील दोघांना अटक
नाशिक : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ५८ किलो सोने लुटीच्या कटामध्ये सहभागी असलेले व वाहनाची इत्थंभूत माहिती दरोडेखोरांना देणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी बुधवारी अटक केली़ तपासाच्या कारणास्तव या दोघांचीही नावे गोपनीय ठेवण्यात आली असून, त्यांना इगतपुरी न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ या दोघांच्या अटकेमुळे लवकरच या सोने लुटीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे़
गेल्या शुक्रवारी (दि़२४) पहाटे तीन वाजेच्यासुमारास वाडीवऱ्हेजवळ पाच तोतया पोलिसांनी जिल्ह्णातील सर्वांत मोठा दरोडा टाकला़ ‘झी’ गोल्ड कंपनीचे ६० किलो सोने अंधेरी येथील सिक्वेल सिक्युरीटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुरक्षा अधिकारी समीर मन्वर पिंजारा, वाहनचालक नावेद अहमद, सुरक्षारक्षक प्रदीप दुबे व संतोष साऊ हे शिरपूरच्या रिफायनरीमध्ये पोहोचविण्यासाठी वाहनाने (एमएच ०२ सीई ४०१०) जात होते़
महामार्गावरील वाडीवऱ्हेजवळ रंगाच्या लोगान कारमधून आलेल्या पाच तोतया पोलिसांनी हे वाहन अडविले़ या वाहनातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून ६० किलो सोन्यापैकी सोळा कोटी २३ लाख रुपयांचे ५८ किलो सोने घेऊन ते फरार झाले़ या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींबाबत धागेदारे सापडल्याचा दावा केला होता़ तसेच याबाबत ४० संशयितांची तपासणी करून सात पथकेही विविध ठिकाणी पाठविली होती़ या दरोड्याच्या घटनेला पाच दिवस उलटूनही तसेच धागेदोरी मिळूनही आरोपींना पकडण्यात यश येत नसल्याचे पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते़
दरम्यान, या दरोड्याच्या कटात सामील असलेल्या दोघा संशयितांना पकडण्यात आल्यामुळे लवकरच प्रमुख संशयितांना अटक होण्याची चिन्हे आहेत़ (प्रतिनिधी)
—कोट—
सोने लुटीचा कट रचण्यामध्ये सामील असलेल्या दोन संशयितांना आम्ही ताब्यात घेतले आहे़ या दोघांनी मुख्य आरोपींना सोने कुठून व कोणत्या वाहनातून निघणार आहे याची टीप दिली होती़ तपासाच्या कारणास्तव या दोघांचीही नावे गोपनीय ठेवण्यात आली असून, त्यांना इगतपुरी न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे़
- संजय मोहिते, ग्रामीण पोलीस अधीक्षक, नाशिक़