नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमडी पावडर विक्री करणार्या दोघांना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 ग्रॅम वजनाची पावडर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.साहिल शरफोद्दीन पठाण (21, रा. खडकाळी) आणि नवाज रियाज सैयद (19, रा. मुंबई नाका) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांनी बुधवारी (दि.16) गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळून अंमली पदार्थाच्या नशेत असणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील प्राथमिक चौकशीत त्याने मेफेड्रोन म्हणजेच एमडी पावडरची नशा केल्याचे उघडकीस आले. शहरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यावेळी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाच्या मदतीने सोहिल आणि नवाज यांना ताब्यात घेतले. हे दोघेही संगनमत करून एमडी पावडर विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यांच्याकडून 38 हजार 100 रुपयांचे अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या दोघांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले, सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर, उपनिरीक्षक हिरे, हवालदार दिलीप ढुमणे, पोलीस शिपाई मिलींद बागुल आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
एमडी 'मेफेड्रोन' पावडर विक्री करणार्या दोघा विद्यार्थ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 18:17 IST
शहरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली.
एमडी 'मेफेड्रोन' पावडर विक्री करणार्या दोघा विद्यार्थ्यांना अटक
ठळक मुद्देमहाविद्यालयीन विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी मेफेड्रॉन म्हणजेच एमडी पावडरची नशा केल्याचे उघड