संदीप भालेराव । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कृषी शिक्षणक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने आत्तापर्यंत सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन केले आहे. निवासी शिबिरे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी तंत्रज्ञान पोहचविले जात असून, आधुनिक संपर्क साधनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठ पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. मुक्त विद्यापीठाच्या कृषी संशोधन विभागाच्या माध्यमातून कृषी शिक्षणक्रम चालविले जातात. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे एक लाख २० हजार तरुण शेतीकडे वळले असल्याचा दावा मुक्तविद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाशी संलग्न कृषी विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यासाठी विद्यापीठाकडून अनेक कार्यक्रम तयार करण्यात आले आहे. शेतीविषयक साक्षरता वाढविण्यासाठी शेतकरी, शेती करू शकणारे तरुण आणि कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचारी अशा तीन पातळ्यांवर कृषी विषयक प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांसाठी निवासी शिबिरे तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना कृषिविषयक मार्गदर्शन करण्याचा उपक्रम विद्यापीठ राबवित आहे. अशाप्रकारचे प्रशिक्षण राबविण्यासाठी वर्षभराचे नियोजन केले जाते. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन बघून शेतकऱ्यांनी पीक, माती परीक्षण, उपाययोजना, कृषी व्यवस्थापन आणि लागवड या पातळीवर मार्गदर्शन केले जाते. हंगामात कोणते पीक घ्यावे, त्याची काळजी, औषधे, नियोजन आदिंबाबत शेतकऱ्यांना शिबिरात मार्गदर्शन केले जाते, तर बांधावर जाऊन कृषी विद्यापीठांच्या संशोधनाची माहिती सहप्रयोग दिली जाते. शेतकऱ्यांच्या शिबिरासाठी संपर्क शेतकऱ्याची निवड केली जाते. तो संपर्क शेतकरी हंगाम आणि गावातील पिकानुसार प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करतो आणि त्यानंतर विद्यापीठ त्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सुरू करते. शेतकऱ्यांची निवड होऊन त्यांना विद्यापीठ आवारात निवासी प्रशिक्षण दिले जाते. तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कृषी विस्तार हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने कृषी सल्ला आणि साक्षरता यातून शेतकरी विद्यापीठाशी जोडले गेले आहेत.
अडीच हजार शेतकरी कृषिसाक्षर
By admin | Updated: May 6, 2017 01:46 IST