जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा अडीच तास धुमाकूळ
By Admin | Updated: January 31, 2017 01:04 IST2017-01-31T01:04:28+5:302017-01-31T01:04:40+5:30
पुरुष वार्डात तोडफोड : हातात रॉड घेऊन पसरविली दहशत; पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर घेतले ताब्यात

जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा अडीच तास धुमाकूळ
नाशिक : विषारी औषध प्राशन केल्याने मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने सोमवारी (दि़३०) जिल्हा रुग्णालयात सुमारे अडीच तास अक्षरश: धुमाकूळ घातला़ सलाइन लावलेल्या लोखंडी रॉडने त्याने तोडफोड सुरू केल्याने परिचारिका व रुग्णांची धावपळ उडाली. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक, सात ते आठ कर्मचारी व स्ट्रायकिंग फोर्सच्या जवानांनी वार्डातील उपचार घेत असलेल्या रुग्णांना इजा न होऊ देता वार्डाबाहेर काढले. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या तरुणास शिताफीने ताब्यात घेतले़ सातपूरच्या अशोकनगर परिसरातील मद्यपी तरुणाने शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन केल्याने त्यास कुटुंबीयांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ मद्याची सवय असलेल्या या तरुणाने नशेतच विषारी औषध प्राशन केल्याची माहिती परिचारिकांनी दिली़ गत दोन दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या व प्रकृती स्थिर झाल्याने या तरुणास तिसऱ्या मजल्यावरील पुरुषवार्डात हलविण्यात आले होते़ मद्याची सवय जडलेल्या या तरुणास मद्य न मिळाल्याने सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्याचे मानसिक संतुलन बिघडले़ त्याने हातास लावलेले सलाइन काढून घेत सलाइन रॉड घेऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली़ अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिचारिकांसह या वार्डातील इतर रुग्णही घाबरून सैरावैरा पळायला लागले़ या रुग्णास शांत करण्यासाठी गेलेल्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर तो धाऊन जात होता तर काहींना त्याच्या रॉडचा मारही खावा लागला़ या घटनेची माहिती तत्काळ सरकारवाडा पोलिसांना देण्यात आली़
सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई बगाडे यांच्यासह सात ते आठ कर्मचारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले़ तोपर्यंत तिसऱ्या मजल्यावरील पुरुष कक्षात या युवकाने रॉडने औषधांच्या बाटल्यांची तोडफोड केलेली होती़ त्यास पकडण्यासाठी गेले असता तो रॉड घेऊन अंगावर धाऊन जात होता़ पोलिसांनी मोठ्या चातुर्याने या कक्षातील रुग्णांना ऐकेक करीत बाहेर काढून या कक्षाची जाळी लावून घेतली़ यानंतर स्ट्रायकिंग फोर्सलाही बोलविण्यात आले होते़