Two and a half FSIs now outside the municipal limits | मनपा हद्दीबाहेर आता अडीच एफएसआय

नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना नरेडकोचे सुनील गवादे, जयेश ठक्कर, भाविक ठक्कर, सुनील भायभंग आदी.

ठळक मुद्देराधाकृष्ण गमे: नरेडकोच्या पदाधिका-यांशी चर्चा

नाशिक- शासनाने अलिकडेच घेतलेल्या निर्णयानुसार महापालिका हद्दीलगत बांधकामांना विकास कामांना मोठी संधी आहे. त्यानुसार महापालिकेच्या हद्दीबाहेर दोन किलो मीटरच्या क्षेत्रापर्यंत अडीच एफएसआय उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
नाशिक येथील बांधकाम व्यवसायिकांच्या नरेडको या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकरोड येथील कार्यालयात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नगररचना सहसंचालक प्रतिभा भदाणे व नाशिक महानगर विकास क्षेत्र प्राधीकरणाच्या सहसंचालक सुलेखा वैजापूरकर यांची नुकतीच भेट घेतली.
यावेळी गमे यांनी सांगितले की, शासनाने ३ सप्टेंबर रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महापालिका हद्दीबाहेर विकासकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार दोन किलो मीटर पर्यंतच्या क्षेत्रात अडीच एफएसआय तर हरीत आणि ना विकास विभाग क्षेत्रात एक एफएसआय प्रस्तावित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे नाशिक महापालिका हद्दीबाहेर योजना प्रस्तावित असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रिमीयम शुल्क लागू होणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्टया कमकुवत गट व कमी उत्पन्न गटाच्या नागरीकांना सदनिका उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे, असे गमे यांनी सांगितले. यावेळी भदाणे आणि वैजापुरकर यांनीही विकासकांना मोठी
संधी असल्याचे सांगितले. यावेळी नरेडकाचे अभय तातेड, सुनील गवादे, जयेश ठक्कर, सुनील भायभंग, भाविक ठक्कर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 

 

Web Title: Two and a half FSIs now outside the municipal limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.