पहिल्या दिवशी पाऊणशे बदल्या
By Admin | Updated: May 9, 2017 01:53 IST2017-05-09T01:53:17+5:302017-05-09T01:53:29+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सोमवारी पहिल्या दिवशी ७५ प्रशासकीय व विनंती स्वरूपातील बदल्यांची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पहिल्या दिवशी पाऊणशे बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व वर्ग चार संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही सुरू झाली असून, सोमवारी (दि.८) पहिल्या दिवशी सुमारे ७५ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती स्वरूपातील बदल्यांची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गंगापूररोडवरील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वाघ गुरूजी विद्यालयात या बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. सुरुवातीला महिला व बालकल्याण विभागांतर्गत पर्यवेक्षक संवर्गातील व त्यानंतर सामान्य प्रशासन विभागांअंतर्गत सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी (सांखिकी), कनिष्ठ सहायक व वरिष्ठ सहायक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. कनिष्ठ सहायक संवर्गात ३६ प्रशासकीय स्वरूपाच्या, तर १३ विनंती स्वरूपाच्या बदल्या करण्यात आल्या. वरिष्ठ सहायक संवर्गात १२ प्रशासकीय व दोन विनंती स्वरूपातील बदल्या झाल्या. कनिष्ठ प्रशासन अधिकारी संवर्गातून दोन प्रशासकीय व दोन विनंती बदल्या झाल्या.तसेच सहायक प्रशासन अधिकारी संवर्गातून एकही प्रशासकीय किंवा विनंती बदली होऊ शकलेली नाही. बदल्यांच्या कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा वामन खोसकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण विभागाच्या प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे आदि उपस्थित होते.