अॅट्रॉसिटीच्या आरोपातून बारा वारकरी निर्दोष
By Admin | Updated: July 19, 2016 01:51 IST2016-07-19T01:49:57+5:302016-07-19T01:51:56+5:30
अखंड हरिनाम सप्ताह : वणी खुर्द येथील घटना

अॅट्रॉसिटीच्या आरोपातून बारा वारकरी निर्दोष
नाशिक : सालाबादप्रमाणे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात संत चोखामोळा यांची संतरचना ‘जोहार मायबाप जोहार, तुमच्या महारांचा महार’हे म्हटल्याने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील बारा वारकऱ्यांची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडे यांनी सोमवारी (दि़१८) निदोष मुक्तता केली़ दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द येथील मारुती मंदिरात ६ मे २०१३ रोजी ही घटना घडली होती़
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, वणी खुर्द येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता़ सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी अर्थात ६ मे २०१३ रोजी वारकरी मीराबाई ऊर्फ कल्पना चौधरी यांनी संत चोखामेळा यांची ‘जोहार मायबाप जोहार, तुमच्या महारांचा मी महार’रचना माईकवरून म्हटली़ या रचनेस समाधान पंडित जाधव (रा़राजवाडा, वणी खुर्द) यांनी आक्षेप घेतला़ यानंतर सायंकाळी दिंडी निघाल्यानंतर वारकऱ्यांनी पुन्हा ही रचना सादर केली असता जाधव यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात बारा वारकऱ्यांविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला होता़
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ सरकारपक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले, तर वारकऱ्यांतर्फे अॅड़ मंदार भानोसे यांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ही रचना सादर करण्यात आल्याचे न्यायालयात सिद्ध केले़ या पुराव्यानुसार न्यायाधीश पांडे यांनी सर्व वारकऱ्यांची निर्दोष मुक्तता केली़(प्रतिनिधी)