बारा तासांत बारा मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:04 IST2016-07-12T23:55:27+5:302016-07-13T00:04:22+5:30
उघडिपीकडे वाटचाल : दोन दिवसांत झपाट्याने घटले प्रमाण

बारा तासांत बारा मि.मी. पाऊस
नाशिक : गेल्या रविवारी बारा तासांत १४० मिलिमीटरपर्यंत झालेल्या विक्रमी पावसाचे प्रमाण आता सातत्याने घटत चालले असून, शहरात मंगळवारी (दि.१२) बारा तासांत केवळ १२ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे.
सोमवारी (दि.११) पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती; मात्र दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने बारा तासांमध्ये केवळ १५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी पावसाचे प्रमाण यापेक्षाही अधिक घटले आणि शहरात केवळ १२ मि.मी. पाऊस झाला. एकूणच उशिराने बरसलेला वरुणराजा पुन्हा रुसतो की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. धरणसाठ्यात वाढ झाल्याने महापालिकेने आनंदात लोकप्रियतेसाठी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे; मात्र पावसाचे घटत चालले प्रमाण चिंताजनक असून, पावसाने ओढ दिल्यास धरणाचा जलसाठा खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोमवारपासून शहरासह धरणक्षेत्रातही पावसाचे प्रमाण गेल्या शनिवार, रविवारच्या तुलनेत कमी झाल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून सहज स्पष्ट होते. मंगळवारी धरण क्षेत्रात बारा तासांमध्ये केवळ वीस मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. एकूणच वरुणराजा पुन्हा नाशिककरांवर रुसतो की काय, असे चिन्हे आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र लहरी निसर्ग कधीही आपले रूप बदलू शकतो. सध्यातरी पावसाची उघडिपीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)