वाहन, गृह खरेदीतून कोटींची उलाढाल
By Admin | Updated: October 21, 2015 23:45 IST2015-10-21T23:45:11+5:302015-10-21T23:45:34+5:30
साधला ‘मुहूर्त’ : चारचाकीची खरेदी; फ्लॅटची नोंदणी

वाहन, गृह खरेदीतून कोटींची उलाढाल
नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. या मुहूर्तावर शहरातील वाहन व गृह बाजारात खरेदी-विक्रीच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल झाली. अनेकांनी दुचाकी, चारचाकी खरेदीबरोबरच नवीन घर खरेदीची आगाऊ नोंदणी करत मुहूर्त साधला.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहन, गृह खरेदीवर बहुसंख्य नागरिकांनी भर दिला. शहरात विविध ठिकाणी बहुसंख्य बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्प उभारले आहेत. दसरा तसेच आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नवरात्रोत्सवात बांधकाम व्यावसायिकांसह व वाहन विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात आगळ्यावेगळ्या पद्धतीने जाहिरात करण्यावर भर देण्यात आला. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांमध्ये जाहिरातींची स्पर्धा यावेळी बघावयास मिळाली. विविध सोयीसुविधांचा प्रचार-प्रसाराचा भडिमार करत विपणनच्या पद्धतीने आकर्षक सवलती व्यावसायिक वर्गाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. यामुळे बहुसंख्य नागरिकांनी जाहिरातींमधील माहिती वाचून खरेदी व चौकशीसाठी घराबाहेर पाऊले टाकल्याचे चित्र दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पहावयास मिळाले. शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी गृहप्रकल्पाला भेटी देत चौकशी करून माहिती जाणून घेत सदनिकांची नोंदणी केली.
त्याचप्रमाणे विविध दुचाकी-चारचाकी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडूनदेखील दसऱ्याच्या मुहूर्तावर निवडक उत्पादनांची जाहिरात करत दुचाकी-चारचाकींच्या विविध सोयीसुविधांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुचाकी-चारचाकींच्या दालनांमध्ये नागरिक ांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)