तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प
By Admin | Updated: July 30, 2016 01:30 IST2016-07-30T01:28:08+5:302016-07-30T01:30:15+5:30
लाक्षणिक आंदोलन : सात हजार बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग

तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प
नाशिक : केंद्र सरकार बँकिंग क्षेत्रामध्ये करीत असलेले बदल जनताविरोधी असल्याचा आरोप करीत शुक्र वारी (दि. २९ ) नाशकातील सरकारी आणि खासगी बँकांमधील सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. त्यामुळे शहरातील सुमारे तीनशे कोटींसह जिल्हाभरातील जवळपास तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली.
स्टेट बँकेच्या स्टेट बँक आॅफ पटियाला, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ बिकानेर व जयपूर, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर तसेच स्टेट बँक आॅफ म्हैसूर या बँकांचे स्टेट बँकेत विलीनीक रण करण्यात येऊ नये, या मागणीसह बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशातील नऊ बँक कर्मचारी संघटना आणि सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनियन्सच्या आवाहनानुसार हा संप करण्यात आला होता. संपात सरकारी क्षेत्रातील बँका, जुन्या खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, विदेशी बँका आणि सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संपामध्ये आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन ( एआयबीईए), आॅल इंडिया बँक आॅफिसर्स कॉन्फेडरेशन (आयबोक), नॅशनल कॉन्फेडरेशन आॅफ बँक एम्प्लॉइज (एनसीबीई), आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशन (एआयबीओए), बँक एम्प्लॉइज फेडरेशन आॅफ इंडिया (बेफी), इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन (इन्बेफ), इंडियन नॅशनल बँक काँग्रेस (इन्बोक), नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कर्स ( एनओबीडब्ल्यू), नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक आॅफिसर्स (नोबो) या नऊ संघटनांचे सभासद सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)