बाजारात कोट्यवधींची उलाढाल
By Admin | Updated: April 9, 2016 00:54 IST2016-04-09T00:32:08+5:302016-04-09T00:54:38+5:30
गुढीपाडवा : दीडशेहून अधिक फ्लॅटची विक्री; इलेक्टॉनिक वस्तूंना मागणी वाढली

बाजारात कोट्यवधींची उलाढाल
नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाली. पाडव्याच्या मुहूर्तावर नाशिककरांनी इलेक्टॉनिक वस्तू, दुचाकी व चारचाकी वाहनांसह, घराची खरेदी व बुकिंग केले. एकूणच बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून आला.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे लाभदायक मानले जाते. त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. यंदाही बाजारात उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन व्यवसायांचा शुभारंभ देखील झाला, तर अनेकांनी नवीन वाहनाची खरेदी केली. वाहन खरेदीमध्ये दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण अधिक होते. तुलनेत चारचाकी वाहन खरेदी जेमतेम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक कंपन्यांनी नवीन गाड्या बाजारात आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. अनेक योजनाही कंपन्यांनी आखल्या होत्या. वाहन खरेदी करण्यासाठी तसेच मुहूर्तावरच आपले वाहन घरी नेता यावे, यासाठी गेला आठवडाभरापासून विविध ग्राहकांनी गाड्यांचे बुकिंग करून करण्यात आले होते.