संगणकीय अडचणींमुळे ठरावांची नावे अडचणीत?
By Admin | Updated: November 21, 2015 00:17 IST2015-11-21T00:16:45+5:302015-11-21T00:17:21+5:30
जिल्हा मजूर संघ : ७४६ मतदारांचे ठराव प्राप्त

संगणकीय अडचणींमुळे ठरावांची नावे अडचणीत?
नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संस्था संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. शनिवारी (दि. २१) मतदार सभासदांचे ठराव करून नावे पाठविण्याची अंतिम मुदत आहे.
दरम्यान, गुरुवारपर्यंत मतदार असलेल्या ११८९ सभासदांपैकी ७४६ मतदार सभासदांची नावे ठराव करून जिल्हा मजूर संघाकडे पाठविण्यात आल्याचे समजते.
ज्यांच्याकडे थकबाकी आहे, अशा मतदार सभासदांना मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांची नावे ठरावातून पाठविण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हा मजूर संघाच्या वतीने मजूर संस्थांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा मजूर सहकारी संघाचा पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यानुषंगाने प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. शनिवारपर्यंत (दि. २१) मजूर सहकारी संस्थांनी त्यांच्या मतदार प्रतिनिधींचा ठराव करून तशी नावे जिल्हा मजूर संघाला कळवणे आवश्यक आहे. विहित मुदतीत येणारे मतदार प्रतिनिधींचे ठरावच ग्राह्ण धरण्यात येणार आहे. २१ नोव्हेंबर ही मजूर संस्थांनी ठराव करून मतदार प्रतिनिधींचे नाव कळविण्याची अंतिम मुदत आहे. जिल्हा मजूर संघाच्या सर्व पात्र सभासद मजूर सहकारी संस्थांनी त्यांचे मतदार प्रतिनिधींचे ठराव २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा मजूर सहकारी संघाच्या तिडके कॉलनीतील कार्यालयात कळविण्याचे आवाहन जिल्हा मजूर सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी रौंदळ यांनी केले आहे. जिल्हा मजूर संघाच्या एकूण मतदार असलेल्या ११८९ मतदार सभासदांपैकी गुरुवारपर्यंत ७४६ मतदार सभासदांची नावे ठराव करून जिल्हा मजूर संघाकडे पाठविण्यात आली आहे. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात त्यात आणखी भर पडणार आहे. अंतिम प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर लगचेच जिल्हा मजूर सहकारी संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा मजूर सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागताच आजी-माजी संचालकांनी त्यांच्या समर्थकांच्या नावे मतदार प्रतिनिधींचे ठराव करण्यासाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)