गावठी कट्टा विक्रीचा प्रयत्न; तिघांना अटक
By Admin | Updated: October 18, 2015 23:52 IST2015-10-18T23:51:47+5:302015-10-18T23:52:15+5:30
युनिट तीनची कारवाई : सापळा रचून अटक

गावठी कट्टा विक्रीचा प्रयत्न; तिघांना अटक
नाशिक : गावठी पिस्तूल विकत घेऊन ती व्रिकीच्या प्रयत्नात असलेल्या तिघा संशयितांना जिवंत काडतुसासह शहर गुन्हे शाखेच्या युनिट तीनने शनिवारी (दि़१७) सायंकाळी सापळा लावून पकडले़ यातील दोघे संशयित राहाता तालुक्यातील, तर एक सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहे़
सिन्नर फाट्याजवळील संभाजी हॉटेलसमोर शनिवारी सायंकाळी संशयित दत्तात्रय सुरेश डहाळे, (रा़ शिर्डी, श्रीरामनगर, ता़ राहाता, जि़ अहमदनगर), मनोहर रामभाऊ घुगे (रा़ नीलम अपार्टमेंट, सिन्नर, नाशिक) व भूषण महिंद्र मोरे (रा़ शिर्डी, श्रीरामनगर, ता़ राहाता, जि़अहमदनगर) हे तिघे गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती युनिट तीनला मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी या ठिकाणी सापळा रचून या तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता डहाळे व घुगे यांनी मोरेकडून हा कट्टा व एक जिवंत काडतूस विकत घेतल्याचे सांगितले़ तसेचया कट्ट्याची पुनर्विक्री करण्यासाठी ते या ठिकाणी आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले़
या तिघा संशयितांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)