तरुणास जिवे मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: November 15, 2016 03:53 IST2016-11-15T03:53:00+5:302016-11-15T03:53:00+5:30
कर्जाऊ घेतलेले पैसे परत न दिल्याने त्यांच्या तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध केले व त्यांचे पाय बांधून रेल्वे रुळावर टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास लोहमार्ग

तरुणास जिवे मारण्याचा प्रयत्न
पुणे : कर्जाऊ घेतलेले पैसे परत न दिल्याने त्यांच्या तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध केले व त्यांचे पाय बांधून रेल्वे रुळावर टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.
विनायक दीपक कलाटे (वय २२, रा. औंध) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी विलास भागवत घाडगे (वय ३८, रा. निगडी, मूळ पिंपळगाव, ता. वाशे, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९़३० ते ११़३०च्या दरम्यान घडली होती.
घाडगे यांनी कलाटे याच्याकडून कर्जाऊ रक्कम घेतली होती. ती रक्कम घाडगे परत देऊ शकले नाहीत. त्यामुळे ३० आॅक्टोबर रोजी कलाटे हे साथीदारासह घाडगे यांच्या घरी आले व त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून घेऊन गेले़ पैसे परत केले नाही तर जिवे मारण्याची धमकी देऊन सोडून दिले होते़ त्यानंतर कलाटेने ९ नोव्हेंबर रोजी चौघांना पाठविले़ त्यांनी घाडगे यांना पकडून त्यांच्या गळ्यास व पायास दोरीने बांधले़ त्यांना मारहाण करून त्यांच्या तोंडावर कसला तरी स्प्रे मारला़ त्यामुळे घाडगे हे बेशुद्ध झाले़ त्यानंतर त्यांना आकुर्डी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर रेल्वे रुळावर टाकून दिले़
कलाटेला अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले़ कलाटे याच्या चार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली़ न्यायालयाने कलाटेला १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी़ के़ नंदनवार यांनी दिला आहे़