चौथीच्या विद्यार्थ्यास ठार मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: August 16, 2016 22:44 IST2016-08-16T22:43:50+5:302016-08-16T22:44:53+5:30
लासलगाव : पोलिसांत गुन्हा दाखल

चौथीच्या विद्यार्थ्यास ठार मारण्याचा प्रयत्न
लासलगाव : पिंपळगाव नजीक येथील चौथीत शिकत असलेल्या वैभव रघुनाथ पवार या विद्यार्थ्यास येथीलच दोन अल्पवयीन मुलांनी पेरू तोडण्याच्या बहाण्याने शिवनदीच्या परिसरात नेऊन त्याच्यावर दगडाने डोक्यावर मार करत गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव नजीक येथील चौथीत शिकत असलेला विद्यार्थी वैभव रघुनाथ पवार ध्वजारोहणानंतर घरी आल्यावर परिसरात खेळत असताना त्याला तेथीलच दोन अल्पवयीन मुलांनी पेरू तोडण्याच्या बहाण्याने शिवनदीच्या परिसरात घेऊन गेले व त्याला बागेतून पेरू तोडून घेऊन ये असे सांगितले. मात्र तेथील ती बाग पेरूची नसून डाळिंबाची असल्याने तसेच नदीला पाणी असल्याने त्याने सदर दोन मुलांना विरोध केला. त्यानंतर सदर दोन मुलांनी त्याच्या डोक्यावर दगडाने हल्ला करत त्याला जबर जखमी केले. त्यानंतर या जखमी मुलाचे त्यांनी हात- पाय बांधून त्याचा नायलॉन दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर येथे कोणी तरी येते आहे याची चाहूल लागतात मुलांनी त्याला गाळात फेकून तेथून पळ काढला. त्यानंतर वैभवने सावरत जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी नागरिकांनी सदर मुलाच्या गळ्यावर वळ असल्याचे बघून त्याला स्वच्छ केले व सदर प्रकरणाची माहिती लासलगाव पोलीस स्टेशन येथे देऊन त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (वार्ताहर)