विद्यापीठ पळविण्याचा प्रयत्न; सरकारच्या निषेधाचा ठराव

By Admin | Updated: February 3, 2016 22:51 IST2016-02-03T22:50:59+5:302016-02-03T22:51:28+5:30

स्थायी समिती बैठक : गटनिहाय कामांचे एकत्रिकरण

Trying to flee the university; Government Resolution | विद्यापीठ पळविण्याचा प्रयत्न; सरकारच्या निषेधाचा ठराव

विद्यापीठ पळविण्याचा प्रयत्न; सरकारच्या निषेधाचा ठराव

 नाशिक : माजी आरोग्यमंत्री दिवंगत डॉ. दौलतराव अहेर यांच्या भगीरथ प्रयत्नांनी नाशिकला स्थापन झालेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून ते नागपूरला पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युती सरकारचा निषेध करणारा ठराव बुधवारी (दि. ३) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.
स्थायी समितीची बैठक अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीस सभापती किरण थोरे, उषा बच्छाव, केदा अहेर, शोभा डोखळे, सदस्य रवींद्र देवरे, प्रवीण जाधव, गोरख बोडके, अनिल पाटील, कृष्णराव गुंड, शैलेश सूर्यवंशी आदि उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच प्रा. अनिल पाटील यांनी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून प्रमुख विभाग नागपूरला नेण्याचे सरकारचे कारस्थान असल्याचे सांगत, वन विभागाचे अपर वनसंरक्षक आदि कार्यालयासह अन्य कार्यालये नागपूरला पळविण्याचा सरकारचा डाव असून तो नाशिककरांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधाचा ठराव पाटील यांनी मांडला. तो संमत करण्यात आला. गोरख बोडके दिवंगत डॉ. दौलतराव अहेर यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडला. मुख्य ग्रामसडक योजनेत पहिल्या वर्षी जिल्ह्याला ७८ किलोमीटर रस्ते बांधणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या उपअभियत्यांनी दिली. प्रवीण जाधव यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजा जिल्हा नियोजन मंडळावर पडणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील टप्पा १० ते १२ मधील एकूण २४ कामांपैकी २० कामे अपूर्ण असून चार कामे पूर्ण झाल्याचे संबंधित उपअभियंत्यांनी सांगितले. याचवेळी गोरख बोडके यांनी अंगणवाड्यांची बांधकामे एकत्र निविदा काढताना ती तालुकानिहाय नव्हे तर गटनिहाय काढण्यात यावीत, असा ठराव मांडला. अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी त्यास हरकत घेत असे करणे संयुक्तिक ठरणार नसल्याचे सांगितले; मात्र कृष्णराव गुंड यांनी कामांची तालुकानिहाय नव्हे तर गटनिहायच निविदा काढण्यात यावी, असे स्पष्ट केले.
जिल्ह्णात टंचाई सदृश परिस्थिती असतानाही तांत्रिक कारणांमुळे टॅँकर मंजूर करण्यात अडचणी येत असल्याचे शैलेश सूर्यवंशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Trying to flee the university; Government Resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.