एका विहिरीचे दोनदा अनुदान लाटण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: May 5, 2015 00:48 IST2015-05-05T00:47:53+5:302015-05-05T00:48:24+5:30
एका विहिरीचे दोनदा अनुदान लाटण्याचा प्रयत्न

एका विहिरीचे दोनदा अनुदान लाटण्याचा प्रयत्न
नाशिक : सामाईक जागेतील जुन्या विहिरीचा जवाहर विहीर कार्यक्रमांतर्गत पंचायत समितीला प्रस्ताव पाठवून एकदा अनुदान घेतल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर रोजगार हमी योजनेंतर्गत दुसरी नवीन विहीर बांधून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात वैशाली तानाजी बाजारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील गट नंबर २८० हा दत्तात्रय संपत राजोळे, वैशाली तानाजी बाजारे, कांताबाई राजाराम राजोळे व उषा अरुण राजोळे यांच्या नावे २ हेक्टर ६६ आर क्षेत्र आहे. या क्षेत्रातच दत्तात्रय राजोळे यांची एक पक्की विहीर व उषा अरुण राजोळे यांची कच्ची विहीर आहे. असे असताना याच गटातील कांताबाई राजोळे यांनी सन २००७-०८ मध्ये जवाहर विहीर कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत प्रस्ताव मंजूर करून घेतला. नियमानुसार कांताबाई यांनी स्वत:च्या जागेत विहीर खणणे क्रमप्राप्त असताना त्यांनी दत्तात्रय राजोळे यांची जुनी विहीरच नवीन दाखवून शासनाकडून ७७ हजार ४६८ रुपयांचे अनुदान लाटले. या संदर्भात पंचायत समितीकडे तक्रार केली असता, गावातील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सदर गटात भेट देऊन पाहणी केली असता, कांताबाई राजोळे यांच्या जागेत कोणतीही विहीर खोदलेली आढळून आलेली नाही. याबाबत माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीनुसार कांताबाई राजोळे यांनी १८ मार्च २०१३ रोजी व्हाऊचरने अनुदानाची रक्कम काढल्याचे स्पष्ट झाले. शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पंचायत समितीकडे पाठपुरावा केला असता, पंचायत समितीचे अधिकारी अडचणीत येतील असे कारण सांगून चौकशी करण्यास टाळाटाळ करण्याबरोबरच, अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कांताबाई राजोळे यांचे नावे रोजगार हमी योजनेंतर्गत नवीन प्रस्ताव तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे वैशाली बाजारे यांनी म्हटले आहे. या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.