वसाका सुरू करण्यासाठी प्रयत्न
By Admin | Updated: September 28, 2014 23:25 IST2014-09-28T23:24:38+5:302014-09-28T23:25:01+5:30
संतोष मोरे : वार्षिक सर्वसाधारण सभा

वसाका सुरू करण्यासाठी प्रयत्न
लोहोणेर : गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत असलेला वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखान्याची चाके आगामी हंगामात कोणत्याही परिस्थितीत फिरण्यात येतील त्यासाठी संचालक मंडळाला सर्वांनी सहकार्य करावे व संचालक मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहवे, असे आवाहन वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक संतोष मोरे यांनी वार्षिक विशेष सर्वसाधारणप्रसंगी केले.
वसाकाची वार्षिक सभा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंदिर आवारात शांततेत झाली. विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक बी. डी. देसले यांनी केले. यावेळी मोरे म्हणाले की, वसाका सुरू करण्यासाठी ज्येष्ठ संचालक दौलतराव अहेर व शांताराम अहेर यांनी प्रयत्न केले. वसाका कामगारांसह इतर देणी टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. त्यात कामगारांना प्रथम प्राधान्य राहील. उत्पादन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक सभासद शेतकऱ्यांनी किमान १ एकर ऊसाची लागवड करावी, असे आवाहन केले. यावेळी प्रभाकर पाटील, अशोक देवरे, शांताराम जाधव, अॅड. शशिकांत पवार, नारायण पाटील, बा. ना. पाटील, यशवंत पाटील, शिवाजी हिरे, भरत पाळेकर, फुला जाधव, बी. डी. देसले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
निफाड मतदारसंघात जनजागृती मोहीम
निफाड :निफाड विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ. शशीकांत मंगरुळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप अहेर यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड मतदार संघातील विविध गावात मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. पिंपळगाव (ब), सायखेडा या व इतर गावातही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. संबंधीत गावातील विद्यार्थ्यांनी हातात मतदान करा, हक्काचे मतदान करा अशा आशयाचे फलक घेऊन रॅली काढली. या गावातील नागरिकांमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. या रॅलींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.(वार्ताहर)