त्र्यंबकची ‘गौतमी योजना’ धोक्यात

By Admin | Updated: September 3, 2014 00:33 IST2014-09-03T00:33:03+5:302014-09-03T00:33:03+5:30

त्र्यंबकची ‘गौतमी योजना’ धोक्यात

Trumabank's 'Gautami Yojana' threat | त्र्यंबकची ‘गौतमी योजना’ धोक्यात

त्र्यंबकची ‘गौतमी योजना’ धोक्यात

 

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहर व आखाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारी कोट्यवधी रुपयांची गौतमी योजना भविष्यात अव्यावहारिक ठरण्याची भीती व्यक्त केली जात असून, नजीकच्या काळात त्र्यंबक नगरपालिकेने पाणीपट्टी वा स्वच्छता करात वाढ न केल्यास ‘येरे माझ्या मागल्या’ची गत होऊन योजनाच गुंडाळावी लागणार आहे. अलीकडेच नगरपालिकेने केलेल्या एका पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्र्यंबक शहराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता नारायण नागबली, कालसर्प यांसारख्या तत्सम धार्मिक विधींसाठी देशभरातून भाविक येत असतात, दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक विधीसाठी मुक्कामी राहणाऱ्या पुरोहितांनी आपापली घरे, वाड्यांमध्येच खोल्या काढून व्यवस्था केली आहे. थोडक्यात राहत्या घराचा व्यावसायिक वापर सर्वाधिक त्र्यंबकेश्वरीच असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, त्यासाठी मात्र पिण्याच्या व वापराच्या पाण्याचा वारेमाप वापर केला जातो, त्याचबरोबरच शहराच्या स्वच्छतेवरही अतिरिक्त ताण पडून अप्रत्यक्ष नगरपालिकेलाच त्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामानाने नगरपालिकेला या दोन्ही गोष्टींतून अगदीच अल्पसा आर्थिक मोबदला मिळत आहे. त्र्यंबकला वार्षिक नऊशे रुपये पाणीपट्टी आकारली जाते, म्हणजेच महिन्याकाठी ऐंशी व दिवसाला दोन ते अडीच रुपये दर आकारला जातो. त्यामुळे सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करण्याची बाबही नगरपालिकेवर आर्थिक बोझा लादणारी ठरत असताना, त्यात आता सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणाऱ्या गौतमी योजनेची भर पडली आहे. कुंभमेळ्यात शहराला मुबलक व नियमित पाणीपुरवठा करता यावा तसेच आखाडे व खालशांनाही त्याचा लाभ व्हावा म्हणून ही योजना राबविण्यात येत असून, आंबोली धरणातून या योजनेसाठी पाणी उचलले जाणार आहे. योजना पूर्णत्वास येऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ही योजना चालविली जाणार आहे. त्यानंतर मात्र ती नगरपालिकेकडे हस्तांतरीत केली जाईल. या योजनेच्या देखभाल, दुरुस्तीसाठी येणारा खर्च लक्षात घेता, सध्या नगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीतून ते भागविणे शक्यच नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येत्या काळात नगरपालिकेने करात वाढ न केल्यास ही योजना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळापुरतीच आरंभशूर ठरण्याची भीती बोलून दाखविली जात आहे.

Web Title: Trumabank's 'Gautami Yojana' threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.