विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने ट्रक जळून खाक
By Admin | Updated: March 23, 2017 21:36 IST2017-03-23T21:36:30+5:302017-03-23T21:36:56+5:30
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाट्याजवळ विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने क्रशर यंत्राच्या हुपरीची वाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला बुधवारी आग लागली.

विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने ट्रक जळून खाक
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाट्याजवळ विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने क्रशर यंत्राच्या हुपरीची वाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला बुधवारी आग लागली. चालकासह तिघांनी ट्रकमधून बाहेर उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले. आगीत हुपरसह ट्रकची चाके जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांना एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले.
नाशिकहून क्रशर मशीनसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची दहा टायरच्या ट्रकद्वारे (क्रमांक एम.एच. १५ ए. जी. ९१९६) धुळ्याकडे वाहतूक केली जात होती. चाळीसगाव फाट्याजवळ ट्रक येताच उच्च दाब वाहिनीला ट्रकचा स्पर्श झाल्याने ट्रकसह साहित्याने पेट घेतला. दरम्यान, विद्युतवाहक तार तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. ट्रकमध्ये चालक व क्लिनरसह चार जण होते. चौघांनी वेळीच ट्रकमधून बाहेर उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचू शकले.
अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.(वार्ताहर)