टवाळखोरांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 23:36 IST2016-01-20T23:29:48+5:302016-01-20T23:36:06+5:30
टवाळखोरांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त

टवाळखोरांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त
नाशिकरोड : चांडक-बिटको महाविद्यालयात सध्या विविध ‘डे’ साजरे केले जात असून, त्यामुळे महाविद्यालय परिसरात व जलतरण तलाव येथे टवाळखोर टोळक्यांच्या उपद्रवामुळे परिसरातील रहिवासी, व्यावसायिक, विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी दुचाकी राइडिंग करणारे, छेडछाड बहाद्दरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
चांडक-बिटको महाविद्यालयात सध्या विविध ‘डे’ साजरे केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व महाविद्यालयात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मात्र ज्यांचा महाविद्यालयाशी काहीही संबंध नाही अशा युवक, टवाळखोरांचीदेखील महाविद्यालयाच्या परिसरात गर्दी झालेली असते. महाविद्यालयाच्या शेजारी दोन-तीन शाळा असून, शाळेतील लहान विद्यार्थी, पालक रस्त्याने येत-जात असतात. महाविद्यालयाच्या पाठीमागे जलतरण तलाव येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात युवक, टवाळखोर उभे असतात. वाहनांची राईडिंग करणे, जोरजोरात हॉर्न वाजविणे, शिट्ट्या, शिवीगाळ, आरडाओरड यामुळे परिसरातील रहिवासी, व्यावसायिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
महाविद्यालयामागील काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेल याठिकाणी टवाळखोर युवकांकडून छेडछाड केली जात आहे. यामुळे विद्यार्थी, पालक त्रस्त झाले आहेत. सर्व ‘धांगडधिंगा’ बघून शाळेतील मुलांवर विपरीत परिणाम होत आहे. त्या ठिकाणी विद्यार्थिनी, युवती उभ्या राहात असल्याने टवाळखोरांना आणखी ‘ऊतमात’ येतो. पोलीस आल्यावर पळून जाणारे युवक पुन्हा काही वेळातच तेथे जमतात. पोलिसांनी टवाळखोरांना वठणीवर आणण्याची मागणी परिसरातील महिला, रहिवासी, पालक, व्यावसायिकांनी केली आहे.