कोणार्कनगरला टवाळखोरांचा उपद्रव; महिला त्रस्त
By Admin | Updated: April 26, 2015 23:30 IST2015-04-26T23:30:26+5:302015-04-26T23:30:41+5:30
कारवाईची मागणी : पोलिसांची गस्त नियमित करावी

कोणार्कनगरला टवाळखोरांचा उपद्रव; महिला त्रस्त
पंचवटी : कोणार्कनगर परिसरातील गणेश मार्केट भागात रात्रीच्या सुमाराला काही टवाळखोर, तसेच मद्यपी आरडाओरड व शिवीगाळ करून शांतता भंग करीत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
रात्रीच्या वेळी मद्यपान करून आरडाओरड करणाऱ्या या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील महिलावर्गाने केली आहे. कोणार्कनगर परिसरात दाट लोकवस्ती असून, याच भागात गणेश मार्केट आहे. या गणेश मार्केट परिसरात काही अनधिकृत टपऱ्या थाटलेल्या असून, रात्रीच्या वेळी काही मद्यपी युवक या भागात मुक्तपणे संचार करून खुलेआम मद्यप्राशन करतातच, शिवाय आरडाओरड करून जोरजोराने गलिच्छ शब्द उच्चारणे असे कृत्य करीत असल्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो. याशिवाय या टवाळखोरांमुळे रात्रीच्या वेळी महिलांना घराबाहेर पडणेही अवघड होते. आडगाव पोलिसांची या भागात गस्त रोजच असते; मात्र पोलीस वाहन पाहून टवाळखोर तेथून काढता पाय घेतात आणि पोलीस गेल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर येऊन ठाण मांडून आरडाओरड करतात.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागात टवाळखोरांनी उपद्रव माजविल्याने ज्येष्ठ नागरिक, तसेच महिलावर्ग त्रस्त झाला असून, पोलिसांनी हस्तक्षेप करून या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. पोलिसांनी या परिसरात कायमस्वरूपी पोलीस शिपाई नियुक्त करावेत व त्यांच्यामार्फत टवाळखोरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणीही करण्यात येत आहे. (वार्ताहर)