विजयादशमी उत्साहात
By Admin | Updated: October 13, 2016 00:57 IST2016-10-13T00:54:00+5:302016-10-13T00:57:28+5:30
रावणदहन : बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी; मोठी आर्थिक उलाढाल

विजयादशमी उत्साहात
सिन्नर : शहर व तालुक्यात विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. सराफ बाजार, वाहन खरेदी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला.
सिन्नर तालुक्यावर पाच वर्षांपासून दुष्काळाचे सावट होते. यावर्षी मात्र तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने सर्वांमध्ये उत्साह दिसून आला. प्लॉट, फ्लॅट आणि घर खरेदी करण्यासाठीही काही प्रमाणात उत्साह दिसून आला. सकाळी शहरात सरस्वती पूल, भैरवनाथ मंदिर व वावी वेस भागात नागरिकांनी फुले व आपट्याची पाने खरेदीसाठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातही फुले विक्रीसाठी चौकाचौकांत विक्रेते दिसून येत होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्रेत्यांकडून विविध योजना दिल्या जात होत्या. त्यामुळे ग्राहकांनी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर विविध वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
सायंकाळी सीमोल्लंघन करून आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देत शुभेच्छा देण्यात आल्या. दुष्काळामुळे यावर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पादन कमी असल्याने भाव कडाडले होते. वाहनांना सजवून झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. शहराच्या पश्चिमेला असलेल्या गावाबाहेरील देवीच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
कुंदेवाडीत रावणदहन
तालुक्यातील कुंदेवाडी येथे शिवस्वराज्य फाउंडेशनच्या वतीने विजयदशमीनिमित्ताने सुमारे २५ फूट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
कुंदेवाडी येथील ग्रामदैवत जगदंबामातेची आरती व पूजन झाल्यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ व खोपडीचे सरपंच गणेश गुरुळे यांच्या हस्ते या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. रंगीबेरंगी शोभेची दारू, फटाके यांच्या मनोहारी प्रकाशपर्वात अहंकारी प्रवृत्तीचे दहन करण्यात आले.
फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक सुरेश कुऱ्हाडे, भाऊसाहेब नाठे, हरिभाऊ माळी, ग्रामपंचायत सदस्य रतन नाठे, रवि माळी, बाळासाहेब नाठे, हेमंत माळी, संदीप नाठे, पांडुरंग गोळेसर, अनिल माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून दहातोंडी दहशतवादी रावणाचे दहन करण्यात आले. भास्कर नाठे यांच्या नेतृत्वाखाली ४० मीटरचे कापड वापरून २५ फुटी रावणाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. यावेळी प्रकाश माळी, पोपट गांजवे, शिवाजी नाठे, दीपक सोनवणे, गोरख सोनवणे, भगीरथ माळी, सुनील माळी, बाळू नाठे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)